अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन गॅंगमध्ये टोळी युध्दाची कोणतीही बातमी नसल्याने, या दोघांमधील शत्रूत्व संपले असा सर्वांचा समज झाला होता.
नवी दिल्ली- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन गँगमध्ये असणारे कट्टर वैर जगजाहीर आहे. याच शत्रुत्वापोटी मागील काही वर्षात अनेकदा दाऊदने छोटा राजनच्या हत्येचा कट रचला. मात्र त्यात त्याला यश आले नाही. अशाचप्रकारे दाऊदचा छोटा राजनला मारण्याचा आणखी एक कट फसल्याची माहिती समोर आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला दाऊदने छोटा शकीलच्या मदतीने छोटा राजनच्या हत्येचा कट रचला होता. छोटा शकीलने राजनच्या भारतातील एका विश्वासू सहका-याला फोडून छोटा राजनचा ठावठिकाणा मिळवला. राजन ऑस्ट्रेलियाच्या न्यूकॅसल भागात वास्तव्याला होता.
यानंतर छोटा शकीलने मध्यपूर्व आशियातून काही शूटर्सना तिथे पाठवले. कुठल्याही परिस्थितीत राजनला संपवा, अशा सूचना या शूटर्सना देण्यात आल्या होत्या. मात्र सुदैवाने राजनला आधीच या कटाचा सुगावा लागला आणि काही तासांतच राजन ऑस्ट्रेलिया सोडून सुरक्षित स्थळी रवाना झाला.
भारतीय गुप्तचर यंत्रणा भारतातील दाऊदच्या माणसांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतात. त्यातही पाकिस्तानातून येणा-या फोन कॉल्सवर यंत्रणांचे विशेष लक्ष असते. एप्रिल महिन्यात कराचीहून भारतातील एका क्रमांकावर फोन आला होता.
यात हिंदी आणि उर्दू भाषेत झालेल्या संभाषणातून यंत्रणेला दाऊदच्या या कटाची माहिती मिळाली होती. १९९३ साली दाऊदने मुंबईत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनंतर राजन दाऊदपासून वेगळा झाला होता. त्यानंतर या दोघांच्याही टोळ्यांमध्ये अनेकदा संघर्ष झाले होते. तर २००० साली बँकॉकमध्ये दाऊद टोळीने छोटा राजनवर प्राणघातक हल्ला केला होता. पण त्यावेळी राजन या हल्ल्यातून बचावला होता.
त्यानंतर राजनने या हल्ल्याच्या सूत्रधारांना संपवण्याचा सपाटा लावला होता. मागील काही वर्षात हे दोघेही थंडावल्याने हे टोळीयुद्ध संपल्याची चर्चा होती. मात्र आता हाती आलेल्या या नव्या माहितीनंतर हा संघर्ष अजूनही सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.