अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार अब्दुल करीम टुंडाला शुक्रवारी रात्री भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली.
नवी दिल्ली- भारतात विविध ठिकाणी ४० हून अधिक बॉम्बस्फोट घडवण्याचा आरोप असलेला लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी सईद अब्दुल करीम ऊर्फ टुंडा याला दिल्ली पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवरून शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला शनिवारी सकाळी दिल्ली न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी देण्यात आली.
जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफीज सईद आणि २६/११ हल्ल्याचा कट रचणारा झकीर-उर-रेहमान लखवी यांचा टुंडा हा जवळचा साथीदार आहे, असे दिल्ली पोलिसांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याच्याकडून २३ जानेवारी २०१३ रोजी जारी झालेला पाकिस्तानचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. २०१० साली भारतात आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी दिल्ली तसेच आसपासच्या भागात बॉम्बस्फोट घडवण्याची त्याची योजना होती, असेही पोलिसांनी सांगितले. २००५ साली केनिया येथे त्याला अटक झाली. मात्र पोलिसांच्या ताब्यातून तो निसटला होता. २६/११च्या हल्ल्यानंतर भारताला हव्या असलेल्या २० मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांमध्ये टुंडाचा समावेश आहे. भारतात मुंबई, दिल्ली, हैदराबाद अशा विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासह इतर २१ गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
अब्दुल करीम हा मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. १९८०च्या दशकात मुंबईत आल्यानंतर तो दहशतवादी कारवायांत गुंतला. १९९६ ते १९९८ या कालावधीत दिल्ली, वाराणसी आणि कानपूरमध्ये घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता.
>४० बॉम्बस्फोट घडवण्याचे व ३३ फौजदारी गुन्हे
>२० मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत नाव
>१९९६ मध्ये दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी
>विविध दहशतवादी संघटनांशी संबंध
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटाप्रकरणी टुंडाच्या सहभागाबाबतची माहिती, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर टुंडाच्या कोठडीची मागणी करणार. – डॉ. सत्यपाल सिंह, पोलिस आयुक्त