डोक्यावर लाल-काळी टोपी, हातात व्हल्ले घेऊन कोळी लोकगीतांच्या तालावर नाचत, वाजत-गाजत नारळी पौर्णिमेच्या दिवशी ठाणे खाडी भाग, उरण, वसई, अलिबागचे समुद्रकिनारे तसेच कल्याणच्या खाडीत सोन्याचा प्रतीकात्मक नारळ मोठया जल्लोषात अर्पण करण्यात आला.
कल्याण- डोक्यावर लाल-काळी टोपी, हातात व्हल्ले घेऊन कोळी लोकगीतांच्या तालावर नाचत, वाजत-गाजत नारळी पौर्णिमेच्या दिवशी ठाणे खाडी भाग, उरण, वसई, अलिबागचे समुद्रकिनारे तसेच कल्याणच्या खाडीत सोन्याचा प्रतीकात्मक नारळ मोठया जल्लोषात अर्पण करण्यात आला.
महाराष्ट्र कोळी समाज संघ, कल्याण तालुका परिसर यांच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका अध्यक्ष व संघटक दीपक भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक ते दुर्गाडी गणेशघाटापर्यंत वाजत जात असलेल्या मिरवणुकीचे ठिकठिकाणी कल्याणकरांनी स्वागत केले.
महिला व पुरुषांनी पारंपरिक वेश परिधान केला होता. लहान मुलेही नटून-थटून यात सहभागी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात कोळी गीतांवर नृत्य करत ही मिरवणूक काढण्यात आली. कोळी संस्कृ तीचे जतन करणे, हा या मिरवणुकीतील मुख्य उद्देश असल्याचे दीपक भोईर यांनी सांगितले. या वेळी कल्याण खाडी भागात मासेमारी करून उदरनिर्वाह करणारे अनेक कोळी बांधव उपस्थित होते. या वेळी समुद्र देवतेची विधिवत पूजा करून प्रतीकात्मक सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला. ‘दर्याराजा यंदा मोठया प्रमाणात मासळी मिळू दे, सुख-समृद्धी मिळू दे’ असे साकडेही दर्यादेवाला घालण्यात आले.
पीरवाडी किना-यावर जल्लोष
उरणच्या पिरवाडी किना-यावर जल्लोष आणि उत्साहाच्या लाटा उसळल्या होत्या. यावेळी किना-यावरील वाळूत दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील व्यायामशाळेतील विविध मंडळांनी यात सहभाग घेतला. किना-यावर कोळी समुदायाने, महिला व मुलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वालचंद मुंढे यांच्या सूचनेनुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच उत्साहाच्या भरात खोल समुद्रात जाणा-यांना रोखण्यासाठी नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सहकार्य केले जात होते.