इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी सोमवारी 51 धावांनी जिंकत दक्षिण आफ्रिकेने 2-0 मालिका विजयासह कसोटी क्रमवारीत अव्वल रॅँकिंग पटकवले. मायभूमीतचं पराभव झाल्याने इंग्लंडसाठी हे वर्ष अपयशी ठरत आहे.लंडन – इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी सोमवारी 51 धावांनी जिंकत दक्षिण आफ्रिकेने 2-0 मालिका विजयासह कसोटी क्रमवारीत अव्वल रॅँकिंग पटकवले. अव्वल मानांकित इंग्लंडला त्यांच्याच देशात धूळ चारण्याची अद्वितीय कामगिरी ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखालील द.आफ्रिकेने करून दाखवली. याउलट इंग्लंडचा कर्णधार अॅँड्रयू स्ट्राउससाठी त्याची ही 100 वी कसोटी निराशाजनक ठरली.
द.आफ्रिकेचा हा प्रवास निश्चितपणे सोपा नव्हता. कारण सोमवारी म्हणजे शेवटच्या दिवशी काहीही शक्य होते. विजयासाठी 346 धावांचे लक्ष्य असताना इंग्लंडची सात बाद 208 अशी स्थिती होती. मात्र मॅट प्रायर (73) आणि ग्रॅमी स्वान (41) या जोडीने नवव्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करत इंग्लंडला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या. मात्र स्वान धावचित झाल्यानंतरही प्रायरचा अडथळा पाहुण्यांसमोर होता. त्याचवेळी कर्णधार ग्रॅमी स्मिथने नवीन चेंडू वेगवान गोलंदाज व्हर्नन फिलॅँडरकडे सोपवला. फिलॅँडरने नवीन चेंडूने टाकलेल्या पहिल्याच षटकात प्रायर आणि स्टीवन फिन (0) यांना सलग दोन चेंडूवर बाद करत द.आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लंडसाठी अपयशी वर्ष
भारताला गेल्यावर्षी मायदेशात 0-4 ने नमवल्यावर इंग्लंडने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. मात्र 2012 हे वर्ष त्यांच्यासाठी निराशाजनक ठरले. वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना संयुक्त अरब एमिरॅट्स येथे पाकिस्तानविरुद्धच्या 0-3ने कसोटी मालिका गमवावी लागली. त्यानंतर श्रीलंकेतही त्यांना मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्याला अपवाद जूनमध्ये विंडिजविरुद्ध मायदेशात 2-0ने जिंकलेल्या कसोटी मालिकेचा ठरला.