थॉमस वायडा यांनी गुरुवारी मुंबईतील अमेरिकी सरकारच्या वाणिज्य वकिलातीचा पदभार स्वीकारला.
मुंबई- थॉमस वायडा यांनी गुरुवारी मुंबईतील अमेरिकी सरकारच्या वाणिज्य वकिलातीचा पदभार स्वीकारला. २३ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अमेरिकी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
वायडा हे रंगून (म्यॅनमार) येथील अमेरिकी दूतावासात उच्च पदावर होते. याशिवाय त्यांनी दक्षिण कोरिया, बाल्कन, जर्मनी येथेही काम केले आहे. मुंबईतील पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मध्य पूर्वेतील राष्ट्रांसंबंधीच्या परराष्ट्र खात्यातील विभागाच्या सहसंचालकपदी काम केले आहे.
मध्य पूर्व व आफ्रिकेतील देशांना अमेरिकी सरकारची मदत पोहोचवणे व त्या भागातील राजकीय घटनांचा आणि ‘अरब स्प्रिंग’सारख्या उठावांचा मागोवा घेणे आदी महत्त्वाची कामेही वायडा यांनी केली आहेत. मध्य पूर्वेतील भागांमध्ये राजकीय व आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणारे अनेक महत्त्वाचे उपक्रमही त्यांनी राबवले आहेत.
वायडा यांनी अमेरिकेच्या जगविख्यात स्टॅनफर्ड विद्यापीठाची पदवी मिळवली आहे. ‘फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी’ येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.