भारतीय सैन्यातील नायक अनिल गौंडगे (रा.सेलु, जि.परभणी) यांच्या पत्नी व मुलीच्या शोधासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत या मागणीसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज त्या सैनिकासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुंबई- भारतीय सैन्यातील नायक अनिल गौंडगे (रा.सेलु, जि.परभणी) यांच्या पत्नी व मुलीच्या शोधासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत या मागणीसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज त्या सैनिकासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सदर सैनिकाच्या कुटुंबियांच्या शोधासाठी महाराष्ट्र सरकार पुर्णपणे प्रयत्न करेल असे आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा केली व अहिर यांनी या सैनिकाच्या कुटुंबीयांच्या शोधासाठी केंद्र सरकार स्वतंत्र अधिकारी, टीम नियुक्त करेल असे सांगितले.
महाराष्ट्रातील अनिल गौंडगे हा सैनिक अरूणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना त्यांची पत्नी व मुलगी दोन महिन्यांपासून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी अरूणाचल प्रदेशात पोलीस तक्रार नोंदवुनही अद्याप तपास लागत नसल्याने गौंडगे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. देशासाठी प्राणपणाने काम करणा-या सैनिकांच्या कुटुंबीयांचा शोध लागत नसल्याने राज्यात आणि सोशल मीडियावरूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या बाबत अनिल गौंडगे यांनी आज मुंडे यांची भेट घेतल्यानंतर मुंडे यांनी अनिल गौंडगेसह मुख्यमंत्र्यांची वर्षा या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन कुटुंबीयांचा तातडीने शोध लावावा यासाठी महाराष्ट्र सरकारनेही प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
सदर गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत श्री.फडणवीस यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने तपासकामी पावले उचलावीत अशी विनंती केली. त्यावर या कुटुंबीयांच्या तपासासाठी केंद्रीय गृह मंत्रालय एका स्वतंत्र अधिका-याची नियुक्ती करून त्या मार्फत तपास करेल असे अहिर यांनी सांगितल्याचे मुंडे म्हणाले. सदर सैनिक अनिल गौंडगे यासही केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीत पाचारण केले आहे. यावेळी मुंडे यांच्या समवेत परभणीचे विजय भांबळे, विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई वाघ उपस्थित होत्या.
[EPSB]
[/EPSB]