जगभरात कच्च्या तेलाचा महापूर आला असताना तेलाचे दर येत्या काही काळात प्रति बॅरल २० डॉलरपेक्षाही कमी होतील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने व्यक्त केला आहे.
पॅरिस – जगभरात कच्च्या तेलाचा महापूर आला असताना तेलाचे दर येत्या काही काळात प्रति बॅरल २० डॉलरपेक्षाही कमी होतील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने व्यक्त केला आहे. नजीकच्या भविष्यात तरी तेलाचे दर पुन्हा उसळून वर येण्याची शक्यता नाही, असेही आयईएने स्पष्ट म्हटले आहे.
जगात तेलाचा महापूर आणण्याला ओपेक (तेल निर्यातदार राष्ट्रे) जबाबदार आहेत, असेही आयईएने म्हटले आहे. आपल्या मासिक अहवालात आयईएने जग तेलाने भरून वाहत असताना नजीकच्या काळात तेलाच्या किमती पुन्हा उसळतील, असे होण्याची शक्यता फारच धुसर आहे. उलट तेलाचे दर आणखी कोसळण्याचीच भीती जास्त आहे. प्रति बॅरल २० डॉलरपेक्षाही तेलाचे दर खाली येतील, असे आयईएचा अहवाल सांगतो. जुलै २०१४ मध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर इतके होते. गेल्या महिन्यात तेलाचा दर ३० डॉलर प्रति बॅरल इतका कोसळला. चिनी अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि मागणी घटल्यानंतरही ओपेकने तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतलेला नसल्याने तेलाचे उत्पादन प्रचंड झाले आहे.
तेलाचा उपयोग करणा-या देशांसाठी व जागतिक आर्थिक हालचालींसाठी तेलाच्या कमी किमती उपयुक्त ठरतात. परंतु गुंतवणूकदारांनी तेलाच्या किमतीचा संबंध मागणीशी जोडल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. २८ डॉलर प्रति बॅरल इतकी किमत खाली आल्यावर मध्येच उसळून ३५ डॉलरवर गेली आणि सध्या ३३ डॉलरवर आली आहे. तेलाच्या किमती उसळण्याची शक्यता ज्या घटकांमुळे वाटत आहे, तेच घटक आयईएने अशक्य कोटीतील ठरवले आहेत. त्यातील पहिला घटक म्हणजे ओपेक व ओपेकबाहेरच्या देशांमध्ये तेलाचे उत्पादन कमी करण्यावर कराराची संभाव्यता हा आहे. अशी कपात होण्याची शक्यता जवळपास नाहीच, असे आयईएने म्हटले आहे. इराकने उत्पादनाचा उच्चांक केला असून सौदीतूनही तेलनिर्यातीचे प्रमाण वाढले आहे.