तेलंगण राज्य निर्मितीसंदर्भातील विधेयकाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
नवी दिल्ली- तेलंगण राज्य निर्मितीसंदर्भातील विधेयकाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. तेलंगण राज्य निर्मीतीच्या सध्याच्या टप्प्यावर हस्तक्षेप करायचा नसल्याचे न्यायलयाने म्हटले आहे.
आंध्र प्रदेशमधून तेलंगण राज्य निर्मितीची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरु केली आहे. यासंदर्भातील विधेयक संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. मात्र हे विधेयक सादर करण्यास स्थगिती द्यावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
यासंदर्भात १८ नोव्हेंबर २०१३मध्ये तेलंगण राज्य निर्मितीला स्थगिती देण्याचा कोणताही विचार नसल्याचे मत नोंदवले होते. शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने याआधी दिलेल्या मतामध्ये बदल करण्याचा कोणताही विचार नसल्याचे मत व्यक्त केले.
संसदेच्या चालू अधिवेशनात तेलंगण राज्य निर्मितीचे विधेयक सादर केले जाणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून आंध्र प्रदेशमधील खासदारांनी गदारोळ केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज होऊ शकले नाही. हे विधेयक १० फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे.