महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी १०० रुपये किलो दराने तूरडाळ देण्याची घोषणा मोठय़ा थाटात केली. मात्र, अजूनही तूरडाळ १५० रुपयांपेक्षा महागच आहे.
नवी मुंबई- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी १०० रुपये किलो दराने तूरडाळ देण्याची घोषणा मोठय़ा थाटात केली. मात्र, अजूनही तूरडाळ १५० रुपयांपेक्षा महागच आहे. त्यामुळे नवी मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांनी १०० रुपयांत तूरडाळ मिळवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच १०० रुपयांची मनिऑर्डर पाठवण्याचे आंदोलन केले.
मनसेचे स्थानिक पदाधिकारी गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नेरूळ पोस्ट ऑफिसमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारी घोषणा फसवी असल्याचा आरोप करत थेट मुख्यमंत्र्यांनाच तूरडाळीसाठी मनिऑर्डर पाठवली व तूरडाळ देण्याची मागणी केली.
जवळपास ५०० मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्येकी १०० रुपयांची मनी ऑर्डर मुख्यमंत्र्यांना केली. याप्रसंगी उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, विनोद पार्टे, सचिव अॅड. कौस्तुभ मोरे, महिला सेनेच्या डॉ. आरती धुमाळ, आप्पा कोठुळे, विद्यार्थी सेनेचे सविनय म्हात्रे, तसेच मनसेचे कार्यकत्रे उपस्थित होते.