रशिया-तुर्कस्तान सीमेवर रशियन बॉम्बर जेट विमान पाडल्याचा तुर्कस्तानला अनेक वेळा पश्तात्ताप करायला लावू, अशी धमकी रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी दिली.
मॉस्को- रशिया-तुर्कस्तान सीमेवर रशियन बॉम्बर जेट विमान पाडल्याचा तुर्कस्तानला अनेक वेळा पश्तात्ताप करायला लावू, अशी धमकी रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी दिली. अतिरेक्यांना तुर्कस्तान करत असलेल्या मदतीकडे रशिया दुर्लक्ष करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. देशाला उद्देशून केलेल्या वार्षिक भाषणात पुतिन यांनी वरील इशारा दिला.
दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पी भूमिका घेणा-या पाश्चात्त्य राष्ट्रांना पुतिन यांनी सणसणीत इशारा देताना म्हटले की, फक्त आपल्या स्वार्थासाठी त्यानी दहशतवाद्यांचा उपयोग करून घेऊ नये.
गेल्या आठवडय़ात रशिया-तुर्कस्तान सीमेवर रशियन लढाऊ विमान पाडण्यात आले होते. त्याबाबत तुर्कस्तानला शिक्षा करण्यासाठी आणखी निर्बंध लादण्याची क्रेमलिनची योजना असल्याचे पुतिन म्हणाले.
निर्बंधाची योजना म्हणून रशियाने तुर्कस्तानातून खाद्यपदार्थाच्या आयातीवर बंदी घातली आहे. सीरिया व इराकवर ताबा असलेल्या इस्लामिक स्टेट अतिरेक्यांकडून तेलाच्या तस्करीमुळे तुर्कस्तानचे अध्यक्ष ताईप एडरेजेन व त्यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळत असल्याचा आरोप पुतिन यांनी पूर्वीच केला आहे. गुरुवारी मात्र पुतिन यांनी विशिष्ट योजना स्पष्ट न करता आणखी पुढे जाऊन तुर्कस्तानला धडा शिकवू, असे सांगितले.