अनेकदा सावजाच्या शोधात असणारे तुमच्यातील कमजोरी, पालकांसोबतचा तुमचा विसंवाद, तुमचा बिनधास्त स्वभाव, तुमचे मित्र-मैत्रिणी अशा सर्व गोष्टींवर पाळत ठेवून तुम्हाला अडचणीत आणू शकतात, काहीवेळा अशा विकृतीला साथ देणा-यांत तुमचे मित्रही असू शकतात.. म्हणूनच मैत्रिणींनो मजा करा.. पण, आपल्या सेफ्टीचा, सन्मानाचा एक पासवर्ड आपल्या ग्रुपमध्ये तयार करा, जेणेकरून अशाप्रकारे कुणी तुम्हाला टार्गेट करीत असेल, वा इतर कुणाला टार्गेट करण्याचा प्लॅन करीत असेल, तुम्ही एकमेकींना पासवर्डच्या माध्यमातून सांगू शकाल..
नवरात्रीच्याच नाहीतर अगदी दैनंदिन आयुष्यात आपल्यापैकी अनेकजण अशा प्रसंगाला, अनुभवाला सामोरे जात आहे.. ही समस्या फक्त नोकरदार पालकांच्याच वाटय़ाला येते असे नाही तर ज्यांना वयात येणा-या, अडनिडया वयातल्या आपल्याच मुलांशी संवाद साधताना वेळ मिळत नाही, आपल्या लेकी-बाळी काय करतात, खरेच का आपल्याशी खरे बोलतात, हे कळत नाही.. वा अति महत्त्वाकांक्षा, त्यांच्यावर लादलेल्या अपेक्षा अन अती दुर्लक्ष अशा अनेक कारणांनी आपली मुले चुकीचे काहीतरी करत आहेत.. अशा असंख्य पालकांची ही मोठी अन् गंभीर समस्या आहे, की मुले आमच्याशी संवाद साधत नाहीत.. ती आमच्याशी खोटे बोलतात.. याकरिताच एकच उपाय तो म्हणजे तुम्ही पालकत्वाच्याच नाही तर मित्राच्या नात्याने तुमच्या किशोरवयीन मुलांना तुमच्याबद्दलचा विश्वास द्या.. त्यांना मोकळेपणाने संवाद साधण्याकरिता तुमच्यापर्यंत पोहोचू द्या.. बहरू द्या.. दरवर्षी नवरात्रीनंतरच्या दोन तीन महिन्यात मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या घटना समोर येतात, काहीवेळा अशा विकृतीला साथ देणा-यांत तुमचे मित्रही असू शकतात.. म्हणूनच मैत्रिणींनो मजा करा.. पण, आपल्या सेफ्टीचा सन्मानाचा एक पासवर्ड आपल्या ग्रुपमध्ये तयार करा, जेणेकरून कुणाला टार्गेट करण्याचा प्लॅन करीत असेल, तुम्ही एकमेकींना पासवर्डच्या माध्यमातून सांगू शकाल.. सावध करू शकाल..
नवरात्री सुरू झाल्या की, सगळय़ांनाच वेध लागतात, ग्रुप जमवून धम्माल मस्ती करायचे, गरबा, आई-बाबा थोडे रागावले तरी खिसा सैल करतात, अन् मग खरेदी, नव्या स्टाईल असे सगळे जमून येते.. पण यंदाच्या नवरात्रीत तुम्ही तुमच्या स्टाईल स्टेट्सबरोबरच सेफ्टी पासवर्ड ठरवलात की नाही.. जर अजूनही ठरवला नसेल तर नक्की ठरवून घ्या.. कारण शेवटच्या तीन दिवसांत गरबाचा फेर दांडियाचा ठेका रात्री उशीपर्यंत रंगतो ना..
बहुतांश मेडिकलमध्ये नशेचे औषध विनापरवाना खरेदी वा विक्री केले जाते. नवरात्रीच्या दिवसांत नशेच्या औषधांच्या विक्रीचे प्रमाण वाढलेले गत पाच वर्षातल्या पोलीस कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या औषधांचा उपयोग सॉफ्टड्रिंक्स मध्ये केला असता, चव रंग अन् वास हीन असल्याने लक्षात येत नसले तरी परिणाम जाणवतो.. नशेत असताना लैंगिक शोषण करणे, कोणत्याही प्रतिकाराशिवाय शक्य होते. गतवर्षाच्या तुलनेत पोलीस बंदोबस्त आहे, तरीही आपली सुरक्षा आपणच घ्यायची अन् आपणच चुका करणार नाही, वा भलत्याच आमिशाला भुलणार नाही, हे प्रत्येकीने लक्षात घ्यायचे.. आपल्या पालकांशी मैत्रिणींशी संवाद साधणे, अशा प्रकारचा प्रसंग, आपल्यासोबत घडतो आहे, असे वाटल्यास त्वरीत पोलिसांना सांगणे या गोष्टी केल्याच पाहिजे.
प्रसंग १
भांडुप स्टेशनला ट्रेन थांबली.. ट्रेनमध्ये चढू की नको.. अशा संभ्रमात असणारी ती पुरती भेदरलेली, घामाघूम झालेली.. हातातल्या फोनवर बोलतानाच अगदी गाडी सुटता सुटता तिने गाडीत पाय ठेवला.. कशीबशी शेजारी बसली.. हातातला फोन तिच्या आईचा.. ती बोलत होती.. आई मी गेल्या दोन तासांपासून स्टेशनवर आहे.. पिंकीचा पत्ता नाही.. तिच्या मैत्रीणीही तिची सॅक घेऊन तीची वाट बघताहेत, त्यांना मीपण इथेच आहे, हे माहीत नाही.. ती कोणा गुरू नामक मुलासोबत गेली आहे.. तिकडून तिच्या आईचे बहुदा उत्तर की, ती तर क्लासला गेलीय ना.. इकडून हिचा स्वर चिडका, ताणलेला.. आई मी तुला दोन दिवसांपासून सांगत होते, गेले आठ दिवस पिंकी क्लासलाच काय कॉलेजातही जात नाही, तिच्या मैत्रीणी उडवाउडवीची उत्तरं देतात, किंवा एकमेकींना इशा-याने गप्प करतात, आज दुसरा दिवस आहे, मी ऑफिसला दांडी मारून तिच्यावर लक्ष ठेवते.. पण तू आणि बाबा तिच्याशी काहीच बोलत नाही.. आई अगं ती खूप चुकीचं काही करतेय.. तिचा आवाज चढत होता.. डब्यातल्या आसपासच्या सगळय़ांचेच लक्ष आपल्याकडे जातेय हे लक्षात आल्यावर तिने हळू आवाजात बोलायला सुरुवात केली.. आम्ही ऐकणा-या काही मिनिटे स्तब्ध झालो होतो..
प्रसंग २
आई तू सारखा सारखा फोन करू नकोस.. मी आत्ता क्लास करून गीताच्या बहिणीच्या लग्नाची खरेदी करून निघाले आहे. आईचे तिकडून रागाचे, काळजीचे सूर.. आईचा फोन ठेवल्याठेवल्या हिचा मैत्रीणीला फोन.. गीता ऐक, मी दोन दिवस क्लासला आले नाही, आई तुला फोन करेल.. तिला सांग मी तुझ्यासोबत होते, आपण तुझ्या बहिणीची खरेदी करत होतो.. ठिक आहे गं, तुला तो टॉप हवाय ना.. उद्या जाऊयात खरेदीला.. कितीला आहे.. ७५० ना.. देते मी.. असे म्हणत तिने मानभावीपणाने एक युद्ध जिंकल्याच्या थाटात तिचा फोन बंद केला अन् ती पुन्हा इतका वेळ होल्डवर ठेवलेल्या आपल्या मित्रांशी बोलण्यात गुंतून गेली..
डेट रेप टाळण्यासाठी कोणती काळजी घ्याल
>> कार्यक्रमांना मुलींना सहसा एकटय़ाने पाठवू नये. घरातील जबाबदार पुरुष किंवा मैत्रिणींच्या ग्रुपने एकत्र जावे.
>> सर्व मैत्रिणींनी एकमेकींकडे लक्ष ठेवावे व एखादी मैत्रीण मधूनच गायब होऊ नये याची काळजी घ्यावी.
>> कोणत्याही परिस्थितीत कोणी कितीही गोड बोलून भुलथापा दिल्या तरी देखील दारू / शराब / मद्य प्राशन करता कामा नये.
>> आपण स्वत: हाताने सील फोडलेले सॉफ्ट ड्रिंक किंवा पाण्याच्या बाटलीतूनच पाणी प्यावे.
>> इतरांनी कोणीही ऑफर केलेले सॉफ्ट ड्रिंक किंवा पाणी पिऊ नये. असे प्रकार ओळखीच्या मित्रांकडून ही घडल्याच्या नोंदी असल्याने या विषयी कोणावर ही विश्वास ठेवू नये.
>> कार्यक्रमात कितीही जल्लोष, धमाल असली तरी आपले डोळे आणि कान उघडे ठेवावेत. कार्यक्रमात कुठलीही संशयास्पद हालचाल आढळल्यास लगेच कार्यक्रम सोडून घरी यावे.
डेट रेपचे प्रमाण वाढते आहे
१ ते ४% एवढय़ा संख्येवर डेट रेप केस असल्याचे दिसते. अशा केसेस घरातील मंडळी अब्रू नुकसानीच्या भीतीने दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा एखादी केस अगदीच हाताबाहेर जाईल, त्या सुमारास डॉक्टरांचा सल्ला किंवा मेडिकल ट्रीटमेंट घेण्यास येतात. काही दिवसांपूर्वी डेट रेप संदर्भात एक केस हाताळण्यास मिळाली ती म्हणजे, २२ वर्षाच्या मुलीवर तिच्या जवळच्या मित्राने पार्किंग लॉटमध्ये जाऊन अतिक्रमण केल्याचे कळले. ती केस अब्रुनुकसाच्या भीतीने दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु ती मुलगी तेव्हा डिप्रेशनमध्ये असल्याचे कळले तेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मेडिकल ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली. ठराविक व्यक्तीचा फोटो पाहिल्यावर भीती वाटणे, शांत निपचित एका कोप-यात बसणे, रात्रीच्या सुमारास शांत झोप न लागणे, अंग कापणे अशी काहीशी त्या मुलीची अवस्था होत असल्याचे दिसले. पालकांनी नेहमीच मुलांशी संवाद साधून त्यांच्या मनात चालू असलेल्या गोष्टीबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. मुलींनी गरबा, पार्टीस, कार्यक्रमास जाताना आपल्या जवळच्या, विश्वासू व्यक्तींबरोबरच जाणे योग्य आहे. एखाद्या पेयाची खात्री पटल्याशिवाय ते पेय पिऊ नये. याने धोका टाळण्यास मदत होईल.
– डॉ. शैलेश उमाटे, (मानसोपचार तज्ज्ञ)