बीओटी तत्वावर बांधकाम न करता येणा-या ‘ब’ वर्गातील बसस्थानकांच्या बांधकामासाठी तिर्थक्षेत्र विकास निधीतून अनुदान दिले जाईल, असं आश्वासन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
मुंबई -जागा उपलब्ध असलेल्या आणि बीओटी तत्त्वावर बांधकाम न करता येणा-या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्री बसस्थानकांच्या बांधकामासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून काही रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी दिले. बसस्थानकांच्या बांधकामासाठी विकास निधी देण्याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांच्यासह विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि प्रवाशांना योग्य सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच वाहतूक व्यवस्था उत्तम असावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. विभागाने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांची यादी राज्य परिवहन महामंडळास द्यावी, त्यानंतर अशा स्थानकांसाठी एसटी महामंडळाकडे जागा उपलब्ध आहे, पण त्यांचे बांधकाम बीओटी पद्धतीने करणे महामंडळास शक्य नाही, त्या ठिकाणी बसस्थानकांच्या बांधकामासाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून मदत देण्यात येईल, असे पाटील म्हणाले.