परदेशी निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचा अटकपूर्व जामीन मुंबईतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.
मुंबई- परदेशी निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचा अटकपूर्व जामीन मुंबईतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. त्यामुळे तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांना अटक होण्याची शक्यता आहे.
परदेशी निधीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या मुंबईतील जुहू येथील निवासस्थान तसेच कार्यालयांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १४ जुलै रोजी छापे घातले. यावेळी अटक होण्याची शक्यता असल्याने सेटलवाड यांनी मुंबईतील विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती.
गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय परदेशी निधी स्वीकारुन परदेशी निधी नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा तिस्ता यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी आठ जुलै रोजी याप्रकऱणी त्यांच्याविरोधात तसेच त्यांचे पती जावेद आनंद आणि गुलाम मोहम्मद पेशिमम यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार कलम १२०ब, तसेच परदेशी निधी नियंत्रण कायदा २०१० आणि परदेशी निधी नियंत्रण कायदा १९७६ मधील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद या दोघांनी २००२मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडानंतरच्या दंगलीतील गुलबर्ग सोसायटीतील पीडित व्यक्तींसाठी जमा केलेल्या निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप आहे. तो निधी त्यांनी स्वतःच्या वैयक्तीक स्वार्थासाठी वापरल्याचा आरोप गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
२००२ सालच्या गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत झालेल्या हत्याकांडातील पीडित व्यक्तींसाठी तिस्ता यांच्या ‘सिटिझन फॉर जस्टिस अँड पीस’ व सबरंग ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांना ७ कोटी १६ लाखांची देणगी मिळाली होती. त्यातील सुमारे दीड कोटी रुपये सेटलवाड आणि त्यांचे पती आनंद यांनी स्वत:साठी खर्च केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.