आयओसीची भारतीय ऑलिंपिक संघटनेवरील कारवाई, भारतीय मष्टियुध्द संघटनेचे निलंबन या घटना ताज्या असताना केंद्रीय क्रीडा मंत्रालाने शुक्रवारी भारतीय तिरंदाजी संघटनेची मान्यता रद्द केली.
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनाने भारतीय ऑलिंपिक संघटनेवरील कारवाई, भारतीय मष्टियुध्द संघटनेचे निलंबन या घटना ताज्या असताना केंद्रीय क्रीडा मंत्रालाने शुक्रवारी भारतीय तिरंदाजी संघटनेची मान्यता रद्द केली. तिरंदाजी संघटनेने सरकारी क्रीडा संहितेच्या वय आणि कालावधी मार्गदर्शकतत्वांचे नियम मोडल्याने तात्काळ प्रभावाने ही कारवाई करण्यात आली आहे.
क्रीडा संहितेमध्ये वय आणि कालवाधीसंबंधी काही नियम आहेत. तिरंदाजी संघटनेच्या गेल्या महिन्यात झालेल्या निवडणूकीत या नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली असे क्रीडामंत्री जितेंद्र सिंह यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. तिरंदाजी संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले भाजप नेते विजयकुमार मल्होत्रा यांनी तीनहून अधिकवेळा तिरंदाजी संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आहे.
या निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने सरकारला सरकारी क्रीडा संहितेनुसार निवडणूका होत नाहीत तोपर्यंत तिरंदाजी संघटनेला मान्यता देऊ नये असे निर्देश दिले. त्यामुळे मान्यता रद्द करत असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
मल्होत्रा सलग दहाव्यांदा अध्यक्षपदी निवडून आले. सलग ४० वर्ष संघटनेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. क्रीडा संहितेच्या नियमांचे हे उल्लंघन असल्याने ही कारवाई करण्यात आली. क्रीडा मंत्रालयाने एएआयला नव्याने निवडणूका घेण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे एएआयला सरकारकडून मिळणारा निधी बंद होणार आहे.