जे.जे. रुग्णालयाच्या ८५० कोटींच्या प्रस्तावित विकास प्रकल्पातील हितसंबंधात अडथळे ठरणा-या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांचा काटा काढण्याचा राज्य सरकारचा डाव यशस्वी ठरला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबई- भायखळा येथील जे.जे. रुग्णालयाच्या ८५० कोटींच्या प्रस्तावित विकास प्रकल्पातील हितसंबंधात अडथळे ठरणा-या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांचा काटा काढण्याचा राज्य सरकारचा डाव यशस्वी ठरला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मागील वर्षभरापासून जे. जे. च्या आवारात उभारल्या जाणा-या कोटय़वधी रुपयांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेतृत्वाखाली होणार होते. पण डॉ. लहाने भ्रष्टाचाराला साथ देत नसल्याने या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कामाचा निविदा निघण्यापूर्वीच त्यांना अधिष्ठाता पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. राज्य सरकारने दिलेला ८५० कोटी रुपयांचा निधी डॉ. लहाने यांच्या हाती पडू नये. यासाठी सरकारने षड्यंत्र रचून डॉ. लहानेंविरूद्ध तक्रारी मागवून जे.जे.च्या अधिष्ठाता पदावरून त्यांना बाजूला करत दिखावा म्हणून वैद्यकीय शिक्षण संचालनालयात हंगामी सहसंचालकपदी तात्पुरती पदोन्नती दिली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. लहानेंच्या हंगामी पदोन्नतीचे खरे मुळ ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयातच दडले असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी जे.जे.च्या आवारातील जुन्या इमारतींच्या पाडकामाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यानंतर बांधकाम सुरू होईल. ही सर्व प्रक्रिया सुरू होण्याआधी स्वच्छ प्रतिमा असलेल्या डॉ. लहाने यांना हटवून सरकारला सोयीच्या डॉक्टरची अधिष्ठाता पदावर नेमणूक करायची आहे. त्याचाच भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ‘मार्ड’ ला हाताशी धरून हा मोठा डाव मंत्रालयातूनच टाकण्यात आला होता. त्यानंतर या रुग्णालयातील नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख व अधिष्ठाता डॉ. लहाने निवासी डॉक्टरांना त्रास देत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. लहाने यांच्या बदलीच्या मागणीसाठी स्थानिक ‘मार्ड’च्या डॉक्टरांनी संपाचे हत्यार उगारले. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे डॉ. लहाने यांच्यावर बदलीची टांगती तलवार होती. बदली करा, तरच संप मागे घेऊ असा तगादा मार्डने लावला होता. डॉक्टरांच्या या संपाची दखल घेत राज्य सरकारने यासंदर्भात निवृत्त न्यायमूर्तीची विशेष चौकशी समिती नेमली. ही समिती दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून दोन महिन्यात अहवाल सादर करणार होती. पण अद्याप या अहवालासंदर्भात कोणीच काही बोलत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हंगामी पदोन्नती नको..
डॉ. तात्याराव लहाने यांना वैद्यकीय शिक्षण संचालनालयात हंगामी सहसंचालकपदी तात्पुरती पदोन्नती दिली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय दिला आहे. पण जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावर काम केल्यानंतर वैद्यकीय संचालनालयात हंगामी सहसंचालकपदी पदोन्नती स्वीकारण्यास डॉ. लहाने यांनी नकार दिला आहे. हंगामी पदोन्नती नको तर कायमस्वरूपी सहसंचालकपदी नियुक्त करा, अशी मागणी डॉ. लहाने यांनी ‘दै. प्रहार’शी बोलताना केली.