पश्चिम बंगालच्या तांतीपारा भागात शुक्रवारी रात्री ‘मिग-२७’ हे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले.
नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या तांतीपारा भागात शुक्रवारी रात्री ‘मिग-२७’ हे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. या अपघातात कुणीही ठार झाले नसून या विमानाचा वैमानिक सुखरूप आहे, अशी माहिती हवाई दलाने दिली.
या विमानाने हाशीमारा हवाई तळावरून नेहमीच्या सरावासाठी रात्रौ ८.२० वाजता उड्डाण केले होते. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अलीपूरद्वार येथे हे विमान कोसळले.
या अपघातातून वैमानिक बचावला आहे, असे हवाई दलाचे प्रवक्ते व ग्रुप कॅप्टन एस. बिर्दी यांनी सांगितले. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
ही दुर्घटना घडल्यानंतर रेडक्रॉस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य हाती घेतले होते. उपविभाग अधिकारी समीरण मोंडल म्हणाले की, या अपघातात वैमानिक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.