बाजारात विकल्या जाणा-या सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटावरील दोन्ही बाजूंच्या ८५ टक्के जागेवर तंबाखूमुळे आरोग्याला होणा-या धोक्याचा चित्ररूपी व शब्दरूपी वैधानिक इशारा छापावा, अशी सूचना केंद्र सरकारने दिली आहे.
मुंबई- बाजारात विकल्या जाणा-या सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटावरील दोन्ही बाजूंच्या ८५ टक्के जागेवर तंबाखूमुळे आरोग्याला होणा-या धोक्याचा चित्ररूपी व शब्दरूपी वैधानिक इशारा छापावा, अशी सूचना केंद्र सरकारने दिली आहे.
यानुसार आता ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए)ने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ‘गेट रेडी फॉर प्लेन पॅकेजिंग’ या नव्या संकल्पनेच्या माध्यमातून ‘स्मॅक दॅट पॅक चॅलेंज’ हा नवा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.
या उपक्रमात जाहिरात कंपन्यांना एकत्र आणून सिगारेट पाकिटांवर व अन्य तंबाखू उत्पादनांवर अत्यंत प्रभावी चित्र छापण्याचे व त्यातून तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम अधोरेखित करण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’च्या कार्यकारी संचालक अनिता पीटर यांनी दिली.
‘जागतिक तंबाखूरहित दिना’निमित्त वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी तंबाखू नियंत्रणाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर अभिनेता विवेक ऑबेरॉय, सीपीएएचे अध्यक्ष वाय. के. सप्रू, अन्न व औषध प्रशासनाचे महाराष्ट्र सह-आयुक्त हरीश बैजल यांच्यासह हिंदी सिनेसृष्टीतील निर्माता व दिग्दर्शक रोहित शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
१ एप्रिल २०१६ रोजी सिगारेट व बिडीच्या पाकिटाच्या दोन्ही बाजूंची ८५ टक्के जागा धोक्याच्या इशा-यासाठी द्यावी, असा आदेश सरकारने दिला. यात ४० टक्के जागेवर तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊन पूर्णपणे सडलेले तोंड, गाल किंवा चेहरा यासारखे चित्र छापण्यात यावे.
२० टक्के जागेवर तंबाखूने कर्करोग होतो, तंबाखू प्राणघातक आहे, तंबाखू म्हणजे मृत्यूशी गाठ अशा प्रकारचा शाब्दिक इशारा इंग्रजी व हिंदी किंवा प्रादेशिक भाषेत छापावा लागेल, असेही नमूद करण्यात आले होते. त्यानुसार सीपीएएने तंबाखूमुक्तीचा संदेश देण्यासाठी ‘स्मॅक दॅट पॅक चॅलेंज’ हा उपक्रम सुरू केला. यात सिगारेट व बिडीच्या पाकिटावर छापण्यात येणा-या मजकुराची स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेसाठी मुंबई, दिल्ली, पुणे व बंगळुरू या शहरांतून ३२५ प्रवेशिका आल्या होत्या. यातून तीन सर्वोत्कृष्ट मजकूर परीक्षकांनी निवडले. दरवर्षी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. तर सरकारने तंबाखूजन्य पदार्थाच्या पाकिटावर धोक्याच्या इशा-याचा संदेश छापण्याचे बंधनकारक केले आहे.
महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ३६० कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. परदेशातून आयात करण्यात आलेल्या गुटख्यांच्या पाकिटावर तेथील लोक कायद्याचे पालन करत असल्याचे दिसून येते. तर आपल्या देशात कायद्याचे उल्लंघन केले जात आहे, अशी खंत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त हरीश बैजल यांनी व्यक्त केली.
धूम्रपानामुळे दरवर्षी देशात ५० लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२०पर्यंत हा आकडा १ कोटीवर जाण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरून व्यक्त होत आहे. याशिवाय, भारतात २५ ते ६९ वयोगटातील साधारणत: सहा लाख लोक तंबाखू व्यसनाला बळी पडत आहेत. त्यामुळे, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनातून नागरिकांना मुक्त करणे हा सीपीएएचा मुख्य उद्देश आहे.
– आय. के. सप्रू, अध्यक्ष, कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन
संगीताच्या माध्यमातून ‘टोबॅको किल्स’ संदेश
तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे आयुष्याला किती घातक आहे, याची कल्पना असूनही काही जण तंबाखू सेवनाचे व्यसन सोडत नाहीत. मात्र, आता संगीत सुरांच्या माध्यमातून उभरत्या गायकांची फळी ‘टोबॅको किल्स’चा संदेश देणार आहेत.
तंबाखूच्या वाईट परिणामासंदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी १२ जून रोजी मरिन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात ‘द सेलिब्रेशन ऑफ लाईफ कॉन्सर्ट’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकर-एहसान-लॉय यांच्यासह अनेक गायक यावेळी एका मंचावर पाहायला मिळणार आहेत.