समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या अंगरक्षकाने डोळा मारत अश्लील हावभाव केल्याने संतप्त झालेल्या एका तरुणीने संबंधित नेत्याच्या मर्सडिीज गाडीची तोडफोड केल्याची घटना उत्तर प्रदेशातील आग्य्रात घडली आहे.
आग्रा- समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या अंगरक्षकाने डोळा मारत अश्लील हावभाव केल्याने संतप्त झालेल्या एका तरुणीने संबंधित नेत्याच्या मर्सडिीज गाडीची तोडफोड केल्याची घटना उत्तर प्रदेशातील आग्य्रात घडली आहे. साध्वी पांडे असे या तरुणीचे नाव आहे.
साध्वी व तिची बहीण ज्योती या आग्य्राच्या रस्त्यावरून दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी सपा नेते अभिनव शर्मा यांची गाडी त्यांच्या मागे होती. यावेळी ‘गाडी पुढे जाताना गाडीत असलेल्या अभिनव शर्मा यांच्या अंगरक्षकाने आपल्याला डोळा मारत अश्लील हावभाव केले.
त्यामुळे आपण त्या अंगरक्षकाचे आपल्या मोबाईलमधून छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गाडी थांबवून आपला मोबाईल फोडून टाकला’, असा आरोप साध्वी यांनी केला आहे. यानंतर संतप्त झालेल्या साध्वी यांनी थेट या सपा नेत्याच्या गाडीवर चढून गाडीची तोडफोड केली. तसेच गाडीवर असलेला समाजवादी पक्षाचा झेंडाही तिने फाडून टाकला.
तर शर्मा यांनी मात्र साध्वी यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या गाडीने साध्वी यांच्या दुचाकीच्या पुढे जाण्यासाठी हॉर्न वाजवला. मात्र साध्वी यांनी आपल्याला पुढे न जाऊ देता गाडी थांबवून थेट आपल्या गाडीची तोडफोड केली, असे शर्मा म्हणाले. तसेच यावेळी साध्वी व त्यांच्या बहिणीने आपल्याला धक्काबुक्की करत आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडली, असाही आरोप शर्मा यांनी केला आहे.
तर आपल्या ज्या अंगरक्षकावर हे आरोप करण्यात आले आहेत, त्याला आपण कामावरून काढून टाकले असून तो दोषी असल्याचे आढळून आल्यास पोलिसांना त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सांगितल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. याबाबतचा तपास सध्या सुरू असला तरीही या तरुणीच्या धाडसाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक केले जात आहे.