महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानांत राहणा-या एका डॉक्टरच्या पत्नीने आत्महत्या केली
मुंबई – नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानांत राहणा-या एका डॉक्टरच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. डॉ. प्रणवी रूपेश गुंडावार (25) असे तिचे नाव आहे. महिन्याभरापूर्वीच प्रणवीचे लग्न झाले आणि तीन दिवसांपूर्वीच ती मुंबईत राहण्यास आली होती. रूपेशला पुढल्या महिन्यात सुट्टी मिळाल्यानंतर प्रणवी आणि रुपेश थायलंडला जाणार होते. मात्र तत्पूर्वीच तिने आत्महत्या केल्याने तिच्या वडिलांसह सासरच्यांना धक्काच बसला आहे.
मूळ नांदेडचा डॉ. रूपेश गुंडावार टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयात (नायर रुग्णालय) पॅथोलॉजीच्या दुस-या वर्षाचा अभ्यासक्रम शिकतो आहे. ऑगस्टमध्येच त्याचे प्रणवीशी लग्न झाले. प्रणवी बीडीएस (दंतवैद्यक) आहे. लग्नानंतर चार दिवसांतच रुपेश पुन्हा महाविद्यालयात रुजू झाला. तो अत्यंत शांत आणि मनमिळाऊ म्हणून ओळखला जातो. पॅथोलॉजीच्या दुस-या वर्षाचा विद्यार्थी असल्याने त्याला चार दिवसांपूर्वीच राहण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने खोली दिली होती.
आनंद भवन या इमारतीत तिस-या मजल्यावर त्याला ही खोली मिळाली होती. प्रणवीही मुंबईत नोकरी करणार होती. तीन दिवसांपूर्वीच या दोघांचेही वडील आनंद भुवनमधील रूपेशच्या घरी आले होते. संसारासाठी आवश्यक सामान त्यांनी या दोघांना घेऊन दिले. नंतर प्रणवीचे वडील हैदराबादला आणि रूपेशचे वडील पुण्यात मुलीला भेटून नांदेडला गेले. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रणवीने तिस-या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. प्रत्येक आठवडय़ाला होणा-या पॅथोलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या चर्चासत्रास यावेळी रूपेश गेला होता. चर्चासत्र सुरू असतानाच अपघात विभागातून या प्रकाराची माहिती रूपेशला देण्यात आली.
रुग्णालय सुरक्षारक्षकांनी प्रणवीला ट्रॉमा वॉर्डात दाखल केल्यावर उपचारांदरम्यान रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. प्रणवीच्या खिशात एक सुरीही पोलिसांना सापडली. सुरीने हाताची नस कापून आत्महत्येचा तिने विचार केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. प्रणवीच्या अंगावर इजा नसल्याचे समजते. दरम्यान गुरुवारी सायंकाळी प्रणवीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास आग्रीपाडा पोलिस करत आहेत.