कोकणातील वैद्यकीय महाविद्यालयाची गरज ओळखून वालावलकर ट्रस्टने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून ट्रस्टचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असणारे हे वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असून कोकणातील या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाला नुकतीच परवानगी देण्यात आली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वर्षाची वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पूर्णत्वास गेली आहे. चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे बी. के. वालावलकर हॉस्पिटल येथे हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार असून, महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांची क्षमता राहणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्याचा स्तर उंचावण्याच्या दृष्टीने हे वैद्यकीय महाविद्यालय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
कोकणात एखादे वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी मागणी सातत्याने शासन दरबारी केली जात होती. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होण्याच्या दृष्टीने आवश्यक अशी स्थिती असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मार्गी लागत नव्हता. अखेर वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न डेरवण येथे प्रत्यक्षात येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयाला सुरुवात होईल.
चिपळुणातील सावर्डेनजीकच्या डेरवण येथे बी. के. वालावलकर हे सुसज्ज रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. १९९६ मध्ये ६० बेडचे रुग्णालय भक्तश्रेष्ठ वालावलकर ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आले. कोकणासारख्या दुर्गम भागात अद्ययावत आरोग्य सुविधा देण्यावर रुग्णालयाचा भर राहिला आहे. तसेच गेल्या १९ वर्षाच्या वाटचालीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने हे रुग्णालय विकसित करण्यावर नेहमीच भर देण्यात आला आहे.
आज वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक ते सर्व निकष पूर्ण करत असताना भव्य इमारतीबरोबरच सीटी स्कॅन, डायलिसीस, एक्स-रे, सोनाग्राफी, ब्लडबँक, ब्लड सेपरेशन युनिट तसेच कॅन्सरवरील उपचार अशा अनेक आधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय नाही. कोकणात वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास आरोग्याच्या अनुषंगाने अनेक विषय मार्गी लागू शकत असल्याने असे वैद्यकीय महाविद्यालय असावे, असा प्रयत्न सातत्याने झाला. कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांत वैद्यकीय अधिका-यांची कमतरता आहे.
रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अनेक वर्षे वैद्यकीय अधिका-यांची रिक्त पदे मोठया प्रमाणात आहेत. तीच परिस्थिती ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांची आहे. परिणामी ग्रामीण भागातील जनतेला वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून वैद्यकीय अधिका-यांच्या उपलब्धतेला अधिक वाव मिळणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्याचा स्तर उंचावण्यामध्ये असे वैद्यकीय महाविद्यालय उपयुक्त ठरणारे आहे. कोकणातील वैद्यकीय महाविद्यालयाची गरज ओळखून वालावलकर ट्रस्टतर्फे २०१३पासूनच त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. २०१५ला त्यात यश आले असून, ख-या अर्थाने वैद्यकीय महाविद्यालयाचे वालावलकर ट्रस्टचे स्वप्न साकारत आहे.
शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असणारे हे वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. कोकणातील हे पहिले महाविद्यालय असून, भारतीय आयुर्विज्ञान परिषद आणि आरोग्य विभागाकडून नुकतीच या महाविद्यालयाला परवानगी दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे महाविद्यालय पूर्णत: विनाअनुदानीत तत्त्वावर चालवले जाणार असून ऑगस्ट महिन्यापासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.
ही प्रवेश प्रक्रिया सरकारी सीईटीनुसार होणार असून त्यातही मराठवाडा, विदर्भ येथील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के व उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. या आरक्षणाअंतर्गत डोंगराळ भागाचा दाखला असणा-या वेगळे आरक्षण आहे. याचा फायदा निश्चितच कोकणातील विद्यार्थ्यांना मिळू शकेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. याशिवाय विद्यार्थिनींसाठी ४० टक्के आरक्षण राहणार आहे.
महाविद्यालयासाठीचे निकष पूर्ण करत असतानाच जुने रुग्णालय हे सर्व ओपीडीसाठी वापरात येऊ लागले आहे. त्याचबरोबर नवीन सुसज्ज वेगळी अशी रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली आहे. याठिकाणी प्रशिक्षित कर्मचारीवर्ग उपलब्ध असून, वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला असून, अशोक रघुनाथ जोशी उर्फ काका महाराज यांचे मार्गदर्शन यासाठी मोलाचे ठरले आहे. डेरवण येथे साकारणारे वैद्यकीय महाविद्यालय कोकणातील दोन जिल्ह्यांसाठी मात्र नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.