स्वाईन फ्लूसारख्या आजारावर मात करण्यासाठी बाजारात विशिष्ट औषध व लस उपलब्ध असली तरी डेंग्यूवर भारतात सध्या कोणतीच लस अथवा प्रभावी औषध उपलब्ध नाही.
मुंबई- एकीकडे डेंग्यूने मुंबईत रुग्ण वाढत असताना ‘रोगाला औषध नाही’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. स्वाईन फ्लूसारख्या आजारावर मात करण्यासाठी बाजारात विशिष्ट औषध व लस उपलब्ध असली तरी डेंग्यूवर भारतात सध्या कोणतीच लस अथवा प्रभावी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाच एकमेव उपचार आहे.
वातावरण बदलांमुळे डासांची पैदास होऊन मुंबईत डेंग्यूला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ४६९ वर पोहोचली. यात ३२० पुरुष व १४९ महिलांचा समावेश आहे तर १३ ते ३० वयोगटांतील व्यक्तीला या आजाराची मोठय़ा प्रमाणात लागण होत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर येते. डेंग्यूचे रुग्ण मुंबईसह राज्यात मोठय़ा प्रमाणात वाढत असले तरी डेंग्यूला रोखण्यासाठी कोणतेही औषध, लस अथवा इंजेक्शन उपलब्ध नाही.
डेंग्यू हा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचे चार प्रकार (डेन १, डेन २, डेन ३ आणि डेन ४ आहेत. त्यांच्याशी संघर्ष करण्यासाठी व हा आजार बरा करण्यासाठी कोणत्याही प्रकारे औषध नाही, अशी माहिती साथरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांनी दिली. सध्या डेंग्यूवर औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाला ताप कमी करण्यासाठीचे औषध देऊनच उपचार केले जातात.
या रुग्णांवर तातडीने उपचार झाले नाहीत तर आजार गंभीर स्वरूप धारण करतो. डेंग्यूमुळे रुग्णाच्या शरीरातील पेशींची संख्या कमी झाल्यास रुग्णाला पेशी किंवा रक्त चढवणे गरजेचे होते. शरीरातील पेशींवर नियंत्रण ठेवणे. रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणे असे उपचार डॉक्टर करतात, असे कीटकनाशक विभागाचे प्रमुख अधिकारी डॉ. राजन नारिंग्रेकर यांनी म्हटले आहे.
डेंग्यू सुरुवातीच्या काळात असलेल्या तापाला रोखण्यासाठी क्रोसिन, पॅरासिटॅमोल अशी औषध न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घेण्यात यावीत. कारण या औषधाने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमी असते. हा आजार टाळण्यासाठी उघडय़ावरील पदार्थ न खाणे, स्वच्छ पाणी पिणे, घरातील पाण्याचे साठे बंद ठेवणे, टाकाऊ वस्तूंची त्वरित विल्हेवाट लावा तसेच व्यक्तींनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. – श्वेता कोठारी, वरिष्ठ संशोधक हाफकीन संस्था