शहरात डेंग्यूची दहशत वाढत असतानाच डास मारण्यासाठी तसेच जनजागृतीच्या नावाखाली महापालिका तिजोरीची लूट सुरू असल्याचे उघड झाले आहे.
मुंबई – शहरात डेंग्यूची दहशत वाढत असतानाच डास मारण्यासाठी तसेच जनजागृतीच्या नावाखाली महापालिका तिजोरीची लूट सुरू असल्याचे उघड झाले आहे. डास मारण्यासाठी फवारणीत वापरण्यात येणा-या ‘पायरेथ्रम अॅस्ट्रॅक्ट-२%’ या औषध खरेदीतील गैरव्यवहार उजेडात आल्यानंतर आता डेंग्यूच्या जनजागृतीसाठी छपाई केलेल्या पोस्टरबाजीतही घोटाळ्याचा आरोप होत आहे. बारा रुपयांमध्ये छपाई होणा-या पोस्टरसाठी मुंबई महापालिकेने २० रुपये मोजत प्रत्येक पोस्टरमागे ८ रुपये खिशात घातल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला.
[poll id=”844″]
स्थायी समितीच्या बैठकीत मनसेने हरकतीच्या मुद्याद्वारे डेंग्यूच्या जनजागृतीबाबत झालेल्या या घोटाळयाकडे सर्वाचे लक्ष वेधले. महापालिकेने गेल्या वर्षी अडीच लाख पोस्टर्सची छपाई करत ५० लाख रुपये खर्च केले. परंतु त्यावेळी ही छपाई पालिकेच्या छापखान्यातून न केल्यामुळे पोस्टरबाजीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या शिफारशीनुसार मुद्रणालयाने परस्पर खासगी छपाईखान्यातून या पोस्टरची छपाई केली होती. त्यामुळे स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी महापालिकेला धारेवर धरले होते.
त्या पोस्टरबाजीचा मुद्दा शांत होत नाही, तोच महापालिकेने नव्याने २ लाख पोस्टरची छपाई केली आहे. यासाठी ४० लाख रुपये खर्च केले. प्रत्यक्षात, या पोस्टरची छपाई प्रत्येकी १२ रुपये या दराने होणे अपेक्षित होते. परंतु, त्यासाठी २० रुपये मोजण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देशपांडे यांनी डेंग्यूच्या नावाखाली पालिकेचे अधिकारी डल्ला मारत असल्याचा आरोप केला. हे आजार म्हणजे अधिका-यांसाठी पैसे लुटण्याचे साधनच बनल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.
भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनीही देशपांडे यांचा आरोपाचे समर्थन करत पोस्टरबाजीमुळे डास पळणार का, असा सवाल उपस्थित केला आहे. ‘पायरेथ्रम अॅस्ट्रॅक्ट २ टक्के’ हे औषध बोगस असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला ६४ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. या औषध खरेदीतील गैरव्यवहार उघडकीस आणल्यानंतरही त्याची चौकशी झाली नाही तसेच प्रशासनाचे अधिकारी कोणताही खुलासा करत नाहीत, याबाबत कोटक यांनी खंत व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी या सर्व आरोपांची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पालिकेच्या छापखान्यात ‘गमिंग शिट’सह छपाई होत नसल्यामुळे खासगी छापखान्यात पोस्टरची छपाई केल्याचा खुलासा महापालिका अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास यांनी केला. मात्र, महापालिकेकडे यासंबंधीची मशिन असतानाही बाहेर छपाई करण्यास देऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मनसेची अतिघाई
पोस्टर छपाईत घोटाळा झाल्याचा आरोप करताना मनसेच्या संदीप देशपांडे यांनी १२ रुपयांचे पोस्टर ३५ ते ४० रुपयांना छापून घेतल्याचा आरोप केला. मात्र, नंतर आकडय़ांत झालेली चूक सुधारताना त्यांनी ही प्रत्येक पोस्टरसाठी २० रुपये मोजल्याचे म्हटले. स्थायी समितीत भ्रष्टाचाराचा आरोप करताना किमान आकडेवारीचे पुरावे नीट अभ्यासणे गरजेचे असते. देशपांडेंसारख्या अभ्यासू नगरसेवकांवर उतावीळपणा केल्यामुळे स्वत:चीच चूक सुधारण्याची वेळ आली.