गणेशोत्सवामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक वाढते. त्यामुळे अपघात रोखण्याकरता राज्य महामार्ग पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मुंबई – गणेशोत्सवामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक वाढते. त्यामुळे अपघात रोखण्याकरता राज्य महामार्ग पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, खासगी वाहनचालकांना झोपेतून जागे करणारे ‘अँटी स्लीप अॅलर्ट’ यंत्र मोफत दिले जाणार आहे.
डुलकी लागल्यास वाहनचालकांना या यंत्रातील ‘बीप’ भानावर आणेल. हे यंत्र प्रथमच भारतात वापरले जाणार आहे. याबरोबरच दारू पिऊन वाहन चालवणा-यांना रोखण्यासाठी महामार्गावर पनवेल, गोव्याची सीमा आणि रायगड जिल्ह्यात तीन पथके तैनात केली जातील, अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक (राज्य महामार्ग) विजय कांबळे यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी जाणा-या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यावर महामार्ग पोलिसांनी अधिक भर दिला आहे. बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने राज्य महामार्ग पोलिसांना ‘अँटी स्लीप अॅलर्ट’ डिवाईस दिले आहेत. अशा प्रकारचे डिवाईस परदेशात वापरले जातात. पहिल्यांदाच गणेशोत्सवात हे डिवाईस वापरले जाणार आहे. तसेच काही खासगी वाहनचालक हे दारू पिऊन गाडय़ा चालवतात, त्यासाठी पनवेल, गोवा बॉर्डर आणि रायगड जिल्ह्यात खास तीन पथके नेमण्यात आली आहेत. तसेच वेगाने गाडय़ा चालवणा-याविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते
यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन ६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या काळात राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर अवजड वाहनांना बंदी असणार आहे. ४७५ किमी अंतर असलेल्या या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त असेल. तसेच एस. टी. महामंडळाच्या पथकाचीही मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे महामार्ग पोलिसांनी एक बेवसाइट सुरू केली आहे. ०२२-२२६२६६५५, ९८३३४९८३३४, ९८६७५९८६७५ आणि ९५०३२११११०, ९५०३५१११०० या क्रमाकांवर एसएमएस केल्यास मदत मिळणार आहे.
पर्यायी मार्ग
ज्या भाविकांना रत्नागिरी येथे जायचे असल्यास त्यांनी मुंबई-पुणे (सातारा, उंब्रज, पाटण-कोयना नगर, पोफळी चिपळूण) याचा अवलंब करावा. तसेच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (सातारा, कराड, आगाशिव लेणी, नांदगाव, मलकापूर, नाणीज, पाली) हा मार्ग वापरावा. तर ज्यांना सिंधुदुर्गात जायचे असल्यास त्यांनी मुंबई पुणे, कोल्हापूर, वैभववाडी, तरळे, कणकवली मार्गे. कोल्हापूर-गगनबावडा, वैभववाडी, तरळे मार्गे कणवलीत जाणे सोपे पडेल. कोल्हापूर-राशीवडे-गारगोटी, आजरा-आंबोली घाट- सांवतवाडी असा मार्ग वापरणे शक्य होईल.
असा असेल डिवाइस
खास परदेशी बनावटीचे हे डिवाईस असणार आहे. हे डिवाइस ब्लूटुथसारखे आहे. वाहनचालकाच्या कानावर लावले जाईल. जर वाहनचालकाची मान खाली वाकल्यावर त्या डिवाइसमधून आवाज येईल. सतत बीपचा आवाज येईल. जेणेकरून वाहनचालकाला झोप येणार नाही. त्यामुळे अपघात रोखले जाणार आहेत.