डीम्ड कन्व्हेअन्सबाबत आकारला जाणारा एक टक्का एलबीटी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ठाणे- डीम्ड कन्व्हेअन्सबाबत आकारला जाणारा एक टक्का एलबीटी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनने याबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला होता.
राज्यात १ एप्रिलपासून एलबीटी लागू झाला. हा कर डीम्ड कन्व्हेअन्स करतानाही घेतला जायचा. सदनिकाधारक पूर्वीच सरकारचे विविध कर भरत असताना त्यात नव्या कराची भर कशाला, असा मुद्दा उपस्थित करत फेडरेशनने याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य सरकारने १ एप्रिलपासून डीम्ड कन्व्हेअन्ससाठी आकारला जाणारा एक टक्का एलबीटी रद्द करण्याचा निर्णय २८ ऑक्टोबर रोजी घेतला. ७ नोव्हेंबर रोजी त्याबाबतचे परिपत्रकही काढले आहे, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. सरकार परिपत्रकानुसार, डीम्ड कन्व्हेअन्स करण्यात येणा-या गृहनिर्माण संस्थांना १ टक्के भरावा लागणारा एलबीटी भरण्याची गरज नाही, मात्र ज्या सदनिकाधारकांनी स्टॅम्प डय़ुटी भरली नसेल, अशा सदनिकाधारकांना हा कर भरावा लागेल, अशी माहिती राणे यांनी दिली.