संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी शात्रज्ञ जे. मंजुळा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी शात्रज्ञ जे. मंजुळा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंजुळा यांनी बुधवारी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम क्लस्टर’ या विभागाची सूत्रे स्वीकारणा-या मंजुळा या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
मंजुळा यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांनी यापूर्वी बंगळूरमधील ‘डिफेन्स ऍव्हिओनिक्स रिसर्च सेंटर’मध्ये संचालक म्हणून काम केले आहे. संशोधक म्हणूनही त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे.
डीआरडीओत येण्यापूर्वी मंजुळा यांनी काही काळ इलेक्ट्रानिक कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे काम केले होते.
हैदराबाद येथील डिफेंस इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वारफेअर विभागात २६ वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. यात त्यांनी सेना, वायु सेना, नौसेना आणि अर्ध सैन्य दलासाठी काही उपकरण आणि सॉफ्टवेअर डिजाइन केले आहेत.
मंजुळा यांना डीआरडीओमधील सर्वोत्कृष्ट कार्य पाहून २०११ मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.