एकीकडे सरकारकडून आधारकार्ड विनामूल्य दिले जात असले तरी दुसरीकडे मात्र काही मंडळींनी शंभर रुपयांत आधारकार्ड देऊन नागरिकांची लूट माजवण्याचा ‘उद्योग’ चालवला आहे.
ठाणे- केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आल्याने ‘आधार’साठी ठिकठिकाणी लांबलचक रांगा लागत आहेत. मात्र, एवढे दिव्य पार करूनही आधारकार्ड मिळत नसल्याने अनेकांच्या पदरी निराशा येते. नेमका याचा फायदा उठवत शंभर रुपयांत आधारकार्ड मिळेल, अशी जाहिरातबाजी सध्या ठाणेकरांना भुलवत आहे.
नोंदणी करूनही अद्याप आधारकार्ड न मिळालेल्या नागरिकांना आधारकार्ड मिळेल, असा मजकूर असलेल्या जाहिरातीचे पत्रक ठाणे रेल्वेस्थानक परिसर, रिक्षा व बस थांबा आदी मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आले आहे.
एकीकडे सरकारकडून आधारकार्ड विनामूल्य दिले जात असले तरी दुसरीकडे मात्र काही मंडळींनी शंभर रुपयांत आधारकार्ड देऊन नागरिकांची लूट माजवण्याचा ‘उद्योग’ चालवला आहे. आधारकार्ड काढण्यासाठी पत्रकावर नाव व मोबाइल क्रमांक देणा-या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्यावर एका सुरक्षारक्षकाला भेटून त्याला पैसे देण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे आधारकार्डसाठी आटोकाट प्रयत्न करणा-या नागरिकांची फसगत होत असल्याचाही अनुभव अनेकांना येत आहे.
ठाण्यात मोक्याच्या ठिकाणांवर लावण्यात आलेल्या या पत्रकांवर अनेकांची नजर पडत असल्याने फसवणुकीचे प्रकार वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेचे प्रभारी मुख्यालय उपायुक्त व जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधता, शंभर रुपये देऊन आधारकार्डची विक्री करणा-यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.