सलामीपासून झोडपशाही धोरण अवलंबणा-या पावसाने सोमवारी उघडीप दिली असली तरी, ठाणे-रायगडमधील काही भागांत त्याची नॉनस्टॉप इनिंग सुरूच आहे.
ठाणे – सलामीपासून झोडपशाही धोरण अवलंबणा-या पावसाने सोमवारी उघडीप दिली असली तरी, ठाणे-रायगडमधील काही भागांत त्याची नॉनस्टॉप इनिंग सुरूच आहे. ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण अंबरनाथ, वसई, डहाणू, पालघर आदी भागांत मंगळवारी सकाळपासून अगदी सायंकाळपर्यंत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू राहिल्याने सखल भागांत पाणी तुंबले होते. महाड, अलिबाग, कर्जत, पनवेल, उरणमध्येही पावसाचे धारानृत्य सुरूच होते.
मुंब्रा येथी संजयन नगर येथे एका मशिदीची भिंत खचली, मात्र जीवितहानी घडल्याचे वृत्त नाही. ठाणे शहरात दिवसभरात ५२ मि. मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कौसा येथील सिम्बॉयसिस हायस्कूलमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे विद्यार्थी व शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. कल्याण-डोंबिवलीतही पावसाने उघडीप न घेतल्याने सखल भागात पाणी तुंबले होते. त्यामुळे रस्त्यावरून वाहने हाकताना वाहनचालकांची दमछाक होत होती. दुपारी दोननंतर रिपरिप करणा-या पावसाने सायंकाळी सातनंतर पुन्हा धडाक्यात सुरुवात केली.