देशातील आघाडीची वाहन उत्पादक टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांचे रविवारी थायलंड येथे संशयास्पद मृत्यू झाला.
बँकॉक- देशातील आघाडीची वाहन उत्पादक टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांचे रविवारी थायलंड येथे संशयास्पद मृत्यू झाला. शांग्रीला हॉटेलच्या २२ व्या मजल्यावरून ते पडले. स्लिम यांच्या रूममध्ये एक चिठ्ठी मिळाल्याचे सांगत ही आत्महत्या असल्याचा अंदाज थायलंडच्या पोलिसांनी सोमवारी व्यक्त केला आहे.
उपकंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी थायलंड येथे आलेल्या स्लिम यांच्या तडकाफडकी मृत्यूने कॉर्पोरेट क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. शांग्रीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये ३० वर्षीय पत्नीसह ते २४ जानेवारीला उतरले होते.
रविवारी चौथ्या मजल्यावरील रिव्हरसाइडवर हॉटेलच्या कर्मचा-यांना त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. २२ व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला असून स्लिम यांच्या रूममध्ये मिळालेल्या चिठ्ठीवरून त्यांनी आत्महत्या केलाचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पुढील तपासासाठी या चिठ्ठीचा थाई भाषेत अनुवाद केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्लिम यांच्यावर हल्ला झाल्यासंबंधी संशयास्पद असे काहीच आढळून आलेले नाही. त्यांच्या रूमच्या खिडक्यांची तावदाने उघडी असल्याचे दिसून आल्याचे थायलंडचे पोलिस लेफ्टनंट सोमयॉट बून्यॉकेओ यांनी सांगितले. दरम्यान स्लिम यांच्या अनपेक्षित मृत्यूबाबत टाटा मोटर्सने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
वाहन क्षेत्राला मंदीने ग्रासले असताना विक्रीला चालना देण्यासाठी स्लिम यांच्याकडून सात्यत्याने नावीन्यतेवर भर दिला गेला. गेल्याच आठवड्यात त्यांनी काटकसरीच्या दृष्टीने कंपनीच्या कर्मचा-यांसमोर स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव ठेवला होता.
भारतातील आव्हानात्मक परिस्थितही कार्ल स्लिम यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये कंपनीची धुरा हाती घेतली. नावीन्यतेवर भर देणारा एक चांगला सहकारी गमावल्याचे दु:ख आहे. – सायरस पी. मेस्त्री, अध्यक्ष, टाटा मोटर्स