देशातील आघाडीची मोटार उत्पादक टाटा मोटर्सच्या नफ्याला पहिल्या तिमाहीत जबरदस्त झळ बसली.
मुंबई- देशातील आघाडीची मोटार उत्पादक टाटा मोटर्सच्या नफ्याला पहिल्या तिमाहीत जबरदस्त झळ बसली. विशेषत: ब्रिटिश उपकंपनी जग्वार लँडरोव्हरच्या (जेएलआर) विक्रीतील घसरणीचा फटका बसून टाटा मोटर्सचा नफा जवळपास निम्म्यावर घसरला आहे.
३० जूनला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४८.७ टक्क्यांनी घटून २,७८६.९१ कोटी रुपयांवर आला. २०१४-१५ या वर्षी या तिमाहीत कंपनीला ५,३९८.२१ कोटी रुपयांचा नफा मिळाला होता.
पहिल्या तिमाहीत कंपनीला ६०,१८०.५७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून ६.१८ टक्के घट झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ६४,१५०.७४ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. ‘जेएलआर’चा महसूल ९.६४ टक्क्यांनी घटून ४९,१७८.५ कोटी रुपयापर्यंत घसरला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत जेएलआरची कामगिरी खूपच निराशाजनक झाली. चीनमधील कामगिरीचा फटका बसला असून ब्रिटन, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील कामगिरी सरस राहिली. टाटा मोटर्सच्या व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीत (निर्यातीसह) या तिमाहीत ६.२ टक्के वाढ झाली.
या कालावधीत कंपनीने १,१७,४३९ वाहनांची विक्री केली. स्टँडअलोन नफ्यातही ३४ टक्के घट होऊन कंपनीने २५७.५७ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली. मात्र काहीशा निराशाजनक कामगिरीनंतरही टाटा मोटर्सचा शेअर २.५२ टक्क्यांनी वधारून ३९२.५५ रुपयांवर गेला.
महिंद्राच्या तिमाही नफ्यात घसरण
मुंबई- देशातील एसयूव्ही मोटार उत्पादक महिंद्रा अँड महिंद्राच्या नफ्यात ३० जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीत ३.३५ टक्के घसरण झाली. या तिमाहीत कंपनीला ८५२.२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. ऑटोमोटिव्ह आणि कृषी उपकरणे विभागातील मंदीचा फटका कंपनीला बसला.
गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ८८१.७८ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली होती. या तिमाही कालावधीत कंपनीने ९,७०८.०५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २.९ टक्के घट झाली.
पहिल्या तिमाहीत पूर्ण मालकी असलेली उपकंपनी महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चर्स लिमिटेडने ४९,३५४ मोटारींची विक्री केली. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने ५९,३४८ मोटारी विकल्या होत्या, असे कंपनीने म्हटले आहे. महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर ०.४७ टक्क्याने घसरून १३८७.६५वर बंद झाला.