मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरोधात या रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी सुरू केलेल्या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून हा संप मिटवण्यासाठी सरकारने या डॉक्टरांसोबत बोलून सामोपचाराने प्रयत्न करावेत.
मुंबई- मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरोधात या रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी सुरू केलेल्या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून हा संप मिटवण्यासाठी सरकारने या डॉक्टरांसोबत बोलून सामोपचाराने प्रयत्न करावेत.
जर त्यातही मार्ग निघत नसेल तर रुग्णाचे हित लक्षात घेऊन गरज पडल्यास या संपकरी डॉक्टरांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी सरकारला विधान परिषदेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य सुनील तटकरे यांनी जे.जे.तील डॉक्टरांच्या संपाचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजपा नेत्या शायना एन. सी. या आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याने या आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे.
रुग्णालयातील मोजकेच डॉक्टर रुग्णसेवा करत असले तरी शस्त्रक्रिया रखडल्याने रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाइकांचेही हाल होत आहेत. सभागृहात गुरुवारी संपाचा विषय निघाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपण संपकरी डॉक्टरांच्या नेत्यांसोबत दोन वेळा चर्चा केली असून पुन्हा चर्चा करणार असल्याची माहिती दिली.
परंतु शुक्रवारीही संप सुरूच असल्याचे तटकरेंनी सभागृहात सांगितले. विरोधी बाकावरील सर्वच सदस्यांनी या मुद्दय़ाकडे लक्ष वेधून घेतले असता, सभापती नाईक-निंबाळकरांनी संप तातडीने मिटवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.