जेएनयू विद्यापीठाच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये विद्यार्थ्यांवर सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या विरोधात मंगळवारी, मुंबई विद्यापीठ कलिना संकुलात तीव्र निदर्शने केली.
मुंबई- जेएनयू विद्यापीठाच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये विद्यार्थ्यांवर सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या विरोधात एसएफआय, एआयएसएफ, एआयएसए, एआयडीएसओ, आरवायए, यूसीडीई आणि डीवायएफआय या डाव्या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी, मुंबई विद्यापीठ कलिना संकुलात तीव्र निदर्शने केली.
केंद्रातील मोदी सरकार डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या विद्यार्थी संघटनांचा आवाज दडपण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाईचा आधार घेत असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारविरोधात आणि जेएनयू प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
जेएनयू विद्यपीठाच्या आवारात ९ फेब्रुवारी रोजी विनापरवानगी कार्यक्रम केल्याचा ठपका ठेवत विद्यापीठाच्या उच्च अधिकार समितीने विद्यार्थांना शिक्षा सुनावली असून त्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. यात जेएनयू प्रशासनाने विद्यार्थी नेता कन्हैयाला १० हजार रुपयांचा दंड, अनिर्बान भट्टाचार्यचे १५ जुलैपर्यंत निलंबन आणि पाच वर्षासाठी विद्यापीठातील कोणत्याही नव्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास बंदी, उमर खालीदला २० हजार दंड आणि एका सत्रासाठी निलंबन, आशुतोषला २० हजार दंड आणि एक वर्षासाठी वसतिगृहाची सुविधा मिळवण्यास अपात्र, ऐश्वर्या, रामा नागा, अनंत, गार्गी, चिंटू यांना प्रत्येकी २० हजार दंड, मुजीब गट्टोचे दोन सत्रासाठी निलंबन करण्याच्या शिक्षा सुनावल्या आहेत.
या शिक्षेच्या विरोधात देशातील विद्यार्थी संघटनांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा ही अन्यायकारक आणि एकांगी भूमिकेतून घेण्यात आली आहे. उच्च अधिकार समिती तसेच कुलगुरू फॅसिस्ट शक्तींच्या दबावाखाली काम करत आहे.
चौकशी समितीचा हा अहवाल आम्ही फेटाळून लावतो आणि विद्यार्थ्यांवरील शिक्षा मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी एसएफआयचे जिल्हा सचिव रामेश्वर शेरे यांनी केली. सरकारने अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवल्या तर त्याला विरोध करण्यासाठी देशभरात विद्यार्थी आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.