जेएनयू विद्यापीठातील उमर खालिदला एका सत्रासाठी निलंबित केले असून, २० हजार रुपयांचा दंड तर, विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला १० हजार रुपयांचा दंड केला आहे.
नवी दिल्ली- दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी नारे दिल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थ्यांवर चौकशी समितीने सोमवारी कारवाई केली असून उमर खालिदला एका सत्रासाठी निलंबित केले असून, २० हजार रुपयांचा दंड तर, विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला १० हजार रुपयांचा दंड केला आहे.
चौकशी समितीने एकूण १४ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. मुजीब गट्टो याला दोन सत्रांसाठी निलंबित करून २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. आशुतोषला एक वर्ष विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये येण्यावर बंदी घालून २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
कन्हैया आणि सौरभ शर्मा यांनाही १०-१० हजारांचा दंड ठोठावला. अनिर्बान भट्टाचार्यला १५ जुलैपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तो २३ जुलैनंतर जेएनयूच्या कोणत्याच अभ्यासक्रमाला पाच वर्षे प्रवेश घेऊ शकणार नाही.
या विद्यार्थ्यांशिवाय रामा नागा, अनंथ कुमार, श्वेता राज, रुबिना आणि चिंटू कुमारी यांनाही २०-२० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच बनो ज्योत्सना लहरी आणि द्रोपदी घोष यांना पाच वर्षांसाठी कॅम्पसमधून बाहेर काढण्यात आले आहे.