जुन्या आग्रा महामार्गावरील रस्त्यालगत असलेली बेकायदा बांधकामे १५ दिवसांत हटवण्याबाबत अतिक्रमणविरोधी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.
शहापूर – जुन्या आग्रा महामार्गावरील रस्त्यालगत असलेली बेकायदा बांधकामे व दुकानांसमोर वाढलेली अतिक्रमणे, अनधिकृत हातगाडया व टप-या १५ दिवसांत हटवण्याबाबत अतिक्रमणविरोधी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. नोटिस मिळाल्यापासून दिलेल्या मुदतीत अतिक्रमणे हटवली न गेल्यास प्रशासनाकडून कारवाई करून ही अतिक्रमणे हटवली जातील, अशा इशाराही नोटिशीत दिला आहे. मुंबई-आग्रा महामार्गापासून पार्थसारथी पेट्रोलपंप ते चेरपोली महामार्ग चौकीपर्यंतचा रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.
या रस्त्याची रुंदी ही रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस सुमारे ३० फूट होती. रस्त्यालगत गटारासाठी मोकळी जागा होती. मात्र, या मोकळ्या जागेत अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे या मार्गाने जाणे कसरतीचे झाले आहे. या बाबत तक्रारी वाढल्यामुळे तहसीलदार सुनील भुताळे, पोलिस अधिकारी गणपत पिंगळे, गटविकास अधिकारी डॉ. करुणा जुईकर व बेकायदा बांधकामविरोधी विभागाचे उपअभियंता शिवदासन यांनी कडक भूमिका घेऊन ही अतिक्रमणे हटवण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत बांधकाम विभागाने जुन्या महामार्गावरील आणि शहापुरातील सुमारे ७०० जणांना नोटिसा पाठवल्या असून पंडित नाका ते सापगावपर्यंतच्या रस्त्यावरील सुमारे ७० जणांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
जी अतिक्रमणे १ जानेवारी २००१ पूर्वीची नियमित करण्यात आली आहेत. त्यांनाही नोटिसा देण्यात आल्या असून त्यासंबंधीची कागदपत्रे बांधकाम विभागात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, केवळ एकाच नोटिस बजावलेल्याने त्यासंबधीची कागदपत्रे टपालाद्वारे सादर केली असून उर्वरीत नोटिसधारकांनी कागदपत्रे सादर न केल्यास २५ सप्टेंबरपासून १५ दिवसांत म्हणजे १० ऑक्टोबरनंतर ही अतिक्रमणे प्रशासनाकडून कारवाई करून हटवली जाणार आहेत. या मार्गावर जीपचालकांचे बेकायदा थांबे आहेत. एसटी स्टँड, अंबिकादेवी मंदिर, उपजिल्हा रुग्णालय तसेच भारंगीनदी परिसरातील जीप थांब्याबाबतही कारवाई होण्याची शक्यता आहे.