जुन्नर तालुक्यात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक बिबटयाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
पुणे- जुन्नर तालुक्यात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक बिबटयाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास जुन्नर डिंगोरे येथील वरखडे वस्ती परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात हा बिबटा अडकला. परिसरात आणखी बिबटे असून त्यांना पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
साई मंडलिक या अडीच वर्षाच्या चिमुरडयाचा बिबटयाने ३ एप्रिल रोजी बळी घेतला होता. मागील पंधरा दिवसांमधील ही तिसरी घटना होती. यापूर्वी बिबटयाच्या हल्ल्यात प्रवीण दुधवडे (वय ५, रा. खामुंडी, ता. जुन्नर) या बालकाचा मृत्यू झाला होता, तर रेणुका वाघमारे (वय ३, रा. खामुंडी, ता. जुन्नर) ही गंभीर जखमी झाली होती.
जुन्नरमध्ये बिबटयाने धुमाकूळ घातला होता. असे असतानाही वनविभागाच्या अधिका-यांनी याकडे सोईस्कररीत्या कानाडोळा केला होता. नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर वनविभागाने याचे गांभीर्य जाणून १० वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावले होते.
वनविभागाचे सुमारे ५० कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी बिबटयाला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर गुरुवारी यश आले. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास बिबटया प्रजातीची चार ते पाच वर्षाची मादी पिंज-यात अडकली.
तीन जणांचा बळी घेणारा हाच नरभक्षक बिबटया असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. वनविभागाने बिबटयाला ताब्यात घेतले असून परिसरात असणारे आणखी बिबटे लवकरात लवकर पकडण्यात येतील, अशी ग्वाही दिली आहे. दरम्यान, परिसरातील नागरिक अजूनही भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे चित्र आहे.