नांदेड जिल्हाधिका-यांच्या कक्षाचे छत कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
नांदेड- जिल्हाधिका-यांच्या कक्षाचे छत कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अचानक मोठा आवाज झाल्यानंतर कर्मचा-यांनी आरडाओरड केली. सुदैवाने जिल्हाधिकारी धीरजकुमार सोमवारी मुंबई येथे बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे अनर्थ टळल्याची चर्चा उपस्थितांत होती.
सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी यांच्या कक्षातील सिलींग अचानक कोसळले. मोठा आवाज झाल्याने कर्मचारी व कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. कक्षाचे दार उघडून पाहिल्यावर हा प्रकार लक्षात आल्यानंतर कर्मचा-यांनी आरडाओरड केली. छताचे सिलिंग जिल्हाधिका-यांच्या टेबलावरच पडल्यामुळे टेबलवरील अनेक फायलींचे नुकसान झाले.
घडलेली घटना गंभीर आणि धक्कादायक असल्याचे व संबंधित बाबीची चौकशी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबईत बैठकीत व्यस्त असल्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.