गेल्या तेरा वर्षांपासून सुरु असलेल्या अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित हिट अँड रन प्रकरणाचा निकाल अखेर बुधवारी लागला.
मुंबई – गेल्या तेरा वर्षांपासून सुरु असलेल्या अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित हिट अँड रन प्रकरणाचा निकाल अखेर बुधवारी लागला. या प्रकरणात सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षाही ठोठावली.
मात्र अवघ्या दोन तासांतच त्याला जामीन मंजूर झाला. पुढील ४८ तासांसाठी त्याला अंतरिम जामीन देण्यात आला आहे. आठ मे रोजी त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामिनावरील सुनावणीदरम्यान सलमान खान उच्च न्यायालयात उपस्थित राहणार नाही. उद्या होणा-या सुनावणीमध्ये सलमान खान जेलमध्ये जाणार की नाही याबाबतचा निर्णय होणार आहे.
२८ सप्टेंबर २००२ मध्ये दारुच्या नशेत असलेल्या सलमान खानने भरधाव गाडी चालवत फूटपाथवर झोपलेल्या पादचा-यांना चिरडले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. तर चौघे जण गंभीर जखमी झाले होते.