थंडगार वारा, हिरवे हिरवे उंच डोंगर आणि त्यावरून खळाळत येणारा दाभोसा धबधबा! या धबधब्याची भुरळ पर्यटकांना पडली नाही तरच नवल!
विरार- थंडगार वारा, हिरवे हिरवे उंच डोंगर आणि त्यावरून खळाळत येणारा दाभोसा धबधबा! या धबधब्याची भुरळ पर्यटकांना पडली नाही तरच नवल! रिमझिम पाऊस आणि गणेशोत्सवाची मिळालेली सुट्टी यामुळे पर्यटकांची पावले जव्हार येथील धबधब्याकडे सध्या वळू लागली आहेत.
थंड हवामानामुळे जव्हारची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून आहे. तेथेच हा धबधबाही आह़े जव्हारपासून साधारण १६ किमी अंतरावर असलेला हा धबधबा विकेंडमध्ये पर्यटकांना आकर्षित करतो. अन्य धबधब्यांच्या तुलनेत येथे पर्यटकांची गर्दी कमी असली तरी हा धबधबा महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असल्याने येथे गुजरातहून येणारे पर्यटकच जास्त असतात. हा धबधबा बारमाही वाहतो़, परंतु पावसाळय़ात येथे जास्त गर्दी असते.
येथे रिसॉर्ट असल्याने पर्यटकांची राहण्याची आणि जेवणाची सोय होते. व्हॅली क्रॉसिंग, सीप लाइन, ट्रेकिंग अशा रोमांचक खेळांचे पर्यटकांसाठी येथे आयोजन केले जात़े धबधब्यावर जाण्यासाठी सुमारे ३०० फूट खोल दरीत उतरावे लागते. पावसाळय़ात थोडेसे हे धोकादायक ठरते. धबधब्याच्या पाण्यातून ब-याचदा मोठमोठे दगड खाली येतात. धबधब्याचे पाणी जेथे कोसळते, तेथे मोठा खड्डा निर्माण झाला असल्याने काळजी घेणे आवश्यक ठरते.