माजी आयपीएस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
नवी दिल्ली – माजी आयपीएस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.यावेळी पत्रकार परिषदेत शहा यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलीही उपस्थित होते.
बेदींच्या भाजपा प्रवेशाची घोषणा करताना शहा यांनी किरण बेदी आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र कोणत्या जागेवरुन त्या निवडणूक लढवणार आहेत याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने प्रेरित झाल्याने आज मी येथे आहे. प्रशासकीय सेवेतील माझ्या ४० वर्षांचा अनुभवाचा उपयोग दिल्लीतील नागरिकांच्या सेवेसाठी करणार आहे. दिल्लीला सध्या स्थिर आणि सक्षम सरकारची गरज आहे – किरण बेदी
येत्या सात फेब्रुवारीला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर १० फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीआधी किरण बेदी यांनी राजकारणात उतरण्याचे संकेत दिले होते. बेदी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या ब-याच चर्चाही त्यावेळी रंगल्या होत्या. किरण बेदी यांनीही आपण राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता फेटाळून लावली नाही असे विधान करत या शक्यतेला दुजोराच दिला होता. अखेर आज त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
नऊ जून १९४९ मध्ये जन्मलेल्या किरण बेदींनी १९७२ मध्ये पोलीस सेवेत प्रवेश केला आणि पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला. २००७ मध्ये त्यांनी पोलीस सेवेतून निवृत्ती घेतली. या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली.