जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी पीडीपी-भाजपा आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे.
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी पीडीपी-भाजपा आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे.
पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहम्मद सईद यांना राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी रविवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. जम्मूमध्ये एका सभागृहात हा शपथविधी सोहळा झाला. भाजपा नेते निर्मल सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
फुटीरतावादाकडून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आलेले सज्जाद लोन यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती उपस्थित होत्या.
नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सईद राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळत आहेत तसेच ते दुस-यांदा आघाडी सरकारचे नेतृत्व करणार आहेत. याआधी २००२ मध्ये त्यांनी पीडीपी-काँग्रेस आघाडीचे नेतृत्व केले होते. त्यावेळी तीनवर्ष ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
पूर्णपणे परस्परविरोधी विचारांचे हे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यासाठी दोघांनी कलम ३७० आणि लष्कराला विशेषधिकार देणा-या कायदा या मुद्यांवर एक एक पाऊल मागे घेतले आहे. भाजपाने तूर्तास काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा आग्रह सोडला आहे तर, पीडीपीने लष्कराला विशेषधिकार देणा-या एएफएसपी कायदा रद्द करण्याचा हट्ट तूर्तास बाजूला ठेवला आहे.