मंदावलेली अर्थव्यवस्था आणि निर्यातीची धिमी चाल यामुळे गोंधळलेल्या चीनने बुधवारी युआन या चलनाचे अवमूल्यन केल्याने आशियाई देशांतही चलन युद्ध भडकण्याच्या भीतीची लाट भारतासह जागतिक बाजारात उसळली.
बीजिंग/मुंबई- मंदावलेली अर्थव्यवस्था आणि निर्यातीची धिमी चाल यामुळे गोंधळलेल्या चीनने बुधवारी युआन या चलनाचे अवमूल्यन केले. डॉलरच्या तुलनेत युआनचे मूल्य १.६ टक्क्यांनी घटवून ६.३३०६ वर आणले. बुधवारीही या चलनाचे मूल्य २ टक्क्यांनी घटवले. यामुळे इतर आशियाई देशांतही चलन युद्ध भडकण्याच्या भीतीची लाट भारतासह जागतिक बाजारात उसळली.
भारताच्या रुपयाने दोन वर्षातील नीचांकी पातळी गाठली आहे. तर शेअर बाजारात तीनशेपेक्षा जास्त अंकांच्या घसरण झाली. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनचे चलनाने मंगळवारी १९९४ नंतरची सर्वात मोठी घसरण नोंदवली होती. शेजारी व्हिएतनामने ही दरदिवशी डाँगमधील चढउतार एक ते २ टक्क्यांपर्यंत लवचिक ठेवले आहे. जपानी येनच्या तुलनेतही डॉलरने दोन वर्षातील उच्चांकी पातळी गाठली.
ऑस्ट्रेलियन डॉलरही डळमळीत झाला. मात्र चीनच्या पीपल्स बँकेने हे अवमूल्यन सातत्याने केले जाणार नसून घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर आंतराष्ट्रीय नाणेनिधीने हे योग्य पाऊल असून यामुळे बाजाराच्या आधारावर चलनाचे दर ठरवण्यास मदत होईल असे म्हटले आहे.
रुपया ६५च्या काठावर
युआनच्या दोन दिवसांत ४ टक्के अवमूल्यनाच्या पार्श्वभूमीवर रुपया बुधवारी आणखी एक मोठय़ा घसरणीची नोंद करत दोन वर्षाच्या तळाला पोहोचला. डॉलरच्या समोर ५९ पैशांनी लोटांगण घालत रुपया ६५च्या काठावर म्हणजेच ६४.७८वर पोहोचला. तत्पूर्वी रुपयाची ६४.७८पर्यंत घसरण झाली होती. युआनच्या अवमूल्यनामुळे जागतिक चलन बाजारात मजबूत होणा-या डॉलरच्या खरेदीकडे बँका आणि आयातदारांनी वळवलेला मोर्चा रुपयाच्या मूळावर आला.
सेन्सेक्स ३८४ अंकांनी आपटला
चिनी चलनाच्या अवमूल्यनाची धास्ती आणि सुधारणांबाबत चिंता लागलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार विक्री केली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३८४ अंकांनी घसरून २७,५१२.२६वर बंद झाला. सलग चौथ्या सत्रांत घसरण नोंदवत हा निर्देशांक २८ जुलैनंतरच्या नीचांकी पातळीला घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी ८,४००च्या खाली येत ११२.९० अंकांची घट होऊन ८,३४९.४५वर बंद झाला. पोलाद, अभियांत्रिकी उत्पादने आणि वस्त्रोद्योग या उद्योगांना युआनचा फटका बसण्याची शक्यता आहे.
गुरुपुष्यामृतयोगाच्या मुहूर्तावर सोने महागले
जागतिक स्तरावर वाढते भाव, लग्नसराईसाठी किरकोळ विक्रेत्यांची खरेदी आणि रुपयाच्या अवमूल्यनामुळे महागलेली आयात यामुळे सोन्याच्या भावामध्ये या वर्षातील एका दिवसात सर्वात मोठी वाढ झाली. विशेष म्हणजे गुरुपुष्यामृतयोगाच्या मुहूर्तावर मुंबई सराफा बाजारात ३५० रुपये तर दिल्ली सराफा बाजारात ६०० रुपयांनी सोने महागले. दिल्लीत प्रमाणित सोन्याचा भाव (९९.५ टक्के शुद्ध) प्रति तोळा २५,८५० रुपये तर मुंबईत २५,६०० रुपयांवर बंद झाला.