जगज्जेता विश्वनाथन आनंदने जगज्जेतेपदाच्या लढतीतील पहिल्या डावात अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला १६ चालींमध्ये बरोबरी मान्य करायला लावली.
चेन्नई- जगज्जेता विश्वनाथन आनंदने जगज्जेतेपदाच्या लढतीतील पहिल्या डावात अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला १६ चालींमध्ये बरोबरी मान्य करायला लावली. अवघ्या दीड तासांमध्येच स्पर्धेतील सलामीची फेरी संपली.
आनंदने काळी मोहरी घेऊन खेळताना रेटी ओपनिंगचा पूर्ण तयारीनिशी सामना केला. पाचव्या आणि सहाव्या चालींमध्ये दोघांनी कॅसलिंग केले. सुरुवातीच्या सात चाली झटपट झाल्या. मात्र त्यापाठोपाठ कार्लसन थोडा दडपणात दिसला. त्याने १२वी चाल खेळायला जवळपास ३० मिनिटांचा कालावधी घेतला. मात्र तरीदेखील त्याला विशेष प्रभावी चाल खेळता आली नाही. याउलट आनंदने कार्लसनच्या दडपणाचा फायदा घेतला. त्याची सुरुवात पाठोपाठच्या १३व्या चालीनेच झाली. आनंदच्या घोडयाला नमवण्यासाठी कार्लसनने वजिराला पुढे आणले. मात्र आनंदने सतत घोडा वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच कार्लसन आणि आनंद सलग तीन चाली (१६व्या चालीपर्यंत) घोडा आणि वजिर यांनाच हलवत राहिले. अखेर दोघांनी बरोबरी मान्य केली. आनंदने या डावादरम्यान ग्रूनफेल्ड इंडियन डिफेन्सचा चांगला अवलंब केला.
गेले काही महिने सतत या लढतीचा विचार करत असल्याने आता ती सुरू झाली याचे समाधान आहे. या लढतीबाबत बरेच तर्कविर्तक करण्यात आले असले तरी माझे लक्ष तयारीकडेच होते. पहिल्या फेरीचे वर्णन बारकाईने करणे शक्य नाही. मात्र माझा खेळ चांगला झाला. काळी मोहरी घेऊन खेळताना इतकी सहज बरोबरी मान्य करता आली हे समाधानाचे आहे. मात्र आता पहिल्या फेरीचा फारसा विचार न करता मी दुस-या फेरीवर लक्ष केंद्रित करणार आहे. – आनंद
पहिल्या फेरीबाबत मी समाधानी नाही. मात्र काहीवेळेला बरोबरी मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो. १०व्या चालीनंतर माझ्यासमोर पर्याय उरले नाहीत. हे लक्षात घेऊन बरोबरी मान्य केली. आता लढतीतील पुढच्या फे-या या दीड तासापेक्षा जास्त असतील अशी अपेक्षा आहे. – कार्लसन
आनंदचा आजचा डाव पांढ-या मोह-यांनी
आनंद रविवारी (१० नोव्हेंबर) लढतीतील दुसरा डाव पांढरी मोहरी घेऊन खेळेल. पहिल्या डावातील बरोबरीमुळे आनंद आणि कार्लसनचा प्रत्येकी अर्धा गुण झाला आहे.
पहिली फेरी लवकर संपल्यावर बुद्धिबळपटूंच्या संमिश्र प्रतिक्रिया
>सर्जी कार्याकिन (ग्रॅँडमास्टर) : काहीवेळेला बुद्धिबळाच्या लढती ऑनलाइन पाहण्यापेक्षा मासे पाहणे जास्त चांगले वाटते.
>आरबी रमेश (ग्रॅँडमास्टर आणि लढतीतील समालोचक) : पहिला डाव लवकर संपला असला तरी आनंदने काळी मोहरी घेऊन खेळताना कार्लसनला बरोबरी मान्य करायला लावली याकडे लक्ष वेधावेसे वाटते. कारण याआधी आनंदला गेल्या दोन लढतींत कार्लसनविरुद्ध काळी मोहरी घेऊन खेळताना पराभव पाहावे लागले आहेत.
>विदित गुजराथी (ग्रॅँडमास्टर) : हा डाव इतक्या लवकर संपेल असे वाटले नव्हते. पहिल्या डावाचे तिकीट काढले नाही हे चांगले झाले.
>पेंटाला हरिकृष्ण (ग्रॅँडमास्टर) : माझी सहानुभूती दोघांच्या संघसहका-यांना आहे कारण त्यांना दीड तासाची विश्रांती मिळाली.
>सुसान पोल्गर (महिला जगज्जेती ग्रॅँडमास्टर आणि लढतीतील समालोचक) ) : पहिल्या डावात इतक्या लवकर बरोबरी मान्य होईल हे अपेक्षित नव्हते.