मुंबई आणि उपनगरात लोकल मार्गावर होणा-या अपघातांनंतर वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होतो.
मुंबई – मुंबई आणि उपनगरात लोकल मार्गावर होणा-या अपघातांनंतर वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होतो. हा आकडा लक्षात घेऊन जखमींना त्वरित उपचार मिळावेत याकरता रेल्वेकडून वैद्यकीय कक्षांची उभारणी करण्यात येत आहे. यापूर्वी, मध्य रेल्वेने आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू केल्यानंतर आता पश्चिम रेल्वेवरही फेब्रुवारी महिन्याच्या अखेपर्यंत दहा वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, वांद्रे व गोरेगाव या स्थानकांवर दोन फेब्रुवारीला या कक्षाचा प्रारंभ करण्यात आला आहे. तर चर्चगेट, बोरिवली आणि विरार या स्थानकांवर १६ फेब्रुवारीपासून वैद्यकीय कक्ष सुरूकरण्यात येणार आहेत. याशिवाय अंधेरी, कांदिवली, वसई रोड आणि पालघर या स्थानकांवर २६ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय कक्षाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
या कक्षांचे काम पाहण्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार वैद्यकीय कक्षामध्ये एक डॉक्टर, नर्स आणि एका सहायकाची नेमणूक करण्यात येते. यामध्ये डॉक्टर किमान एमबीबीएस, नर्स किमान नर्सिग डिप्लोमा आणि सहायकाच्या पदासाठी किमान दहावी पास अशी अट घालण्यात आली असून ही सेवा २४ तास सुरू ठेवण्यात येणार असल्याचे भाकर यांनी सांगितले. या केंद्रांवर ईसीजी मशीन, सक्शन मशीनसह आवश्यक त्या सर्व यंत्रणा पुरवण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० लाख रुपयांची साधनसामग्री देण्यात आली आहे. केंद्राच्या उभारणीसाठीही वेगळी तरतूद करण्यात आली आहे. या कक्षांमुळे अपघातानंतर त्वरित उपचार मिळाल्याने मृत्यूंच्या प्रमाणात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.