देशभरात शुक्रवारी मध्यरात्री वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेचे पाच मोठे आणि विविध ठिकाणी असलेले ६५ जकात नाके बंद करण्यात आले. पालिकेच्या जकात नाक्यांवर शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यत ६२ कोटी ४५ लाख ७७ हजार १०६ रुपये जकातीपोटी जमा झाले, तर शुक्रवारी कागदपत्रांची पूर्तता करू न शकलेले सुमारे ७० ट्रक, तर दक्षता विभागाने जकात चुकवून पळताना पकडलेली सुमारे १५० वाहने नाक्यांवरच आहेत.
मुंबई – देशभरात शुक्रवारी मध्यरात्री वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेचे पाच मोठे आणि विविध ठिकाणी असलेले ६५ जकात नाके बंद करण्यात आले. पालिकेच्या जकात नाक्यांवर शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यत ६२ कोटी ४५ लाख ७७ हजार १०६ रुपये जकातीपोटी जमा झाले, तर शुक्रवारी कागदपत्रांची पूर्तता करू न शकलेले सुमारे ७० ट्रक, तर दक्षता विभागाने जकात चुकवून पळताना पकडलेली सुमारे १५० वाहने नाक्यांवरच आहेत. या सर्वाकडून आणखी सुमारे दोन कोटी रुपयांची भर पालिकेच्या तिजोरीत पडू शकेल असा अंदाज पालिका अधिका-यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईमध्ये विविध प्रकारचा माल घेऊन येणा-या मालवाहू गाडय़ांची पालिकेच्या पाच मोठय़ा आणि ६५ लहान जकात नाक्यांवर तपासणी करून जकात कर वसूल करण्यात येत होता. जकातीपोटी पालिकेला १ एप्रिल ते ३० जून २०१७ या तीन महिन्यांमध्ये १५०० कोटी रुपये मिळतील असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात या तिमाहीत पालिकेला जकातीपोटी १८६४ कोटी रुपये मिळाले. तसेच अखेरच्या दिवशी म्हणजे ३० जून रोजी मध्यरात्रीपर्यत तब्बल ६२ कोटी ५४ लाख ७७ हजार १०६ रुपये जकात पालिकेच्या तिजोरीत जमा झाली. जकात नाक्यांवर शुक्रवारी मोठय़ा प्रमाणावर मालवाहू वाहने आली होती. त्यापैकी सुमारे ७० मालवाहू वाहनांचे चालक आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरले.