वन रॅंक वन पेंन्शनच्या मागणीसाठी नवी दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करणा-या माजी सैनिकांचे आंदोलन शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली – वन रॅंक वन पेंन्शनच्या मागणीसाठी नवी दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करणा-या माजी सैनिकांचे आंदोलन शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला.
स्वातंत्र्य दिन आणि सुरक्षेचे कारण पुढे करुन दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसर रिकामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र माजी सैनिकांनी पोलिसांच्या या जबरदस्तीला विरोध करुन तिथून हलण्यास नकार दिला. यावेळी पोलिसांनी माजी सैनिकांना धक्का-बुक्कीही केली.
सैनिकांचे आंदोलन दडपून टाकले तर, त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे लक्षात आल्याने नंतर पोलिसांनी आपली भूमिका बदलली. आम्ही आंदोलन चालू ठेवण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही मात्र आम्ही आता त्यांना तिथून हटवणार नाही असे नवी दिल्लीचे डिसीपी विजय कुमार यांनी सांगितले.
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने वन रॅंक वन पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यांपासून माजी सैनिक जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात वन रॅंक, वन पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करु शकतात.
लोकसभा निवडणुकीत आश्वासने देऊन माजी सैनिकांची मते मिळवणा-या मोदी सरकारला सत्तेत येऊन वर्ष झाले तरी अजूनही आश्वासनापलीकडे माजी सैनिकांना काहीही मिळालेले नाही.