१९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेनंतर आरडीएक्सचा प्रचंड साठा आणि शस्त्रास्त्रे शोधून काढणा-या ‘जंजीर’ या मुंबई पोलिसांच्या बाँबशोधक पथकातील श्वानालाही सलाम!
![Zanjeer dog](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/03/Zanjeer-dog.jpeg)
मुंबई- जगाला हादरवून सोडणा-या मुंबईत १२ मार्च १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत आरडीएक्सचा वापर झाला होता. लपवून ठेवलेला आरडीएक्सचा प्रचंड साठा आणि शस्त्रास्त्रे शोधून काढण्यासाठी लाखमोलाची कामगिरी करणा-या ‘जंजीर’ या मुंबई पोलिसांच्या बाँबशोधक पथकातील श्वानालाही सलाम!
दुस-या महायुध्दानंतर सर्वाधिक आरडीएक्सचा वापर देशात प्रथमच जगाला हादरवून सोडणा-या मुंबईत १२ मार्च १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत झाला होता. यात २५७ निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले तर, ७१३ जण जखमी झाले. या भीषण बॉम्बस्फोट मालिकेनंतर अन्य ठिकाणी महाविध्वंसक बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेला आरडीएक्सचा प्रचंड साठा शोधण्याचे अफाट कार्य ‘जंजीर’ या गोल्डन लॅब्राडॉर जातीच्या श्वानाने पार पाडले. बॉम्बशोध पथकातील या ‘जंजीर’चा हाडाच्या कर्करोगाने १७ मार्च २००० ला मृत्यू झाला. मात्र त्याचे कार्य आणि त्याने केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे.
‘जंजीर’ने हजारो लोकांचे लाखमोलाचे प्राण वाचवले. महाविध्वंसक आरडीएक्सचा ३,३२९ किलो साठा ‘जंजीर’ने शोधून काढला. ६०० डिटोनेटर्स, २४९ हँड ग्रेनेड, ६४०६ जीवंत काडतूस, ११ सैन्यदलाचे बॉम्ब, ५७ देशी बॉम्ब, १७५ पेट्रोल बॉम्ब, पिस्तूल आणि एके ५६ सारखी शस्त्रास्त्रे ‘जंजीर’ने शोधून काढली.
१९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर मुंबई पोलिसांच्या ‘जंजीर’ ने अनेक बॉम्ब शोधून हजारो मुंबईकरांचे जीव वाचवले होते. मुंबई, मुंब्रा आणि ठाणे येथील बॉम्ब ‘जंजीर’ ने शोधून काढल्याने मोठ्या दुर्घटना टाळता आल्या. १५ मार्च १९९३ रोजी धनजी स्ट्रीटवर आरडीएक्स भरुन ठेवलेली स्कूटर ‘जंजीर’ ने शोधून काढली. तर सिद्धिविनायक मंदिरातून दहा बेवारशी बॅग, तीन एके ५६ रायफल्स, ९ एमएमची पिस्तूल आणि २०० ग्रेनेड ‘जंजीर’ ने अतिशय चलाखीने शोधून काढले. त्यानंतर दुस-याच दिवशी पुन्हा झवेरी बाजारातून ‘जंजीर’ ने दोन बॅगांमध्ये ठेवलेल्या नऊ एके ५६ रायफल शोधून काढल्या.
मुंबई पोलिसांच्या पथकात २९ डिसेंबर १९९२ रोजी सामिल झालेल्या या ‘जंजीर’चा १७ मार्च २००० ला मृत्यू झाला. मुंबई पोलिसांच्या बाँबशोधक पथकातील ‘जंजीर’ या श्वानाने अनेक मोठ्या कामगिरींमध्ये पोलिसांना मदत केली होती. मुंबई पोलिसांचे एक अंग म्हणून श्वान पथकाचे नाव आजही मोठ्या अभिमानाने घेतले जाते. सव्वाकोटी मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सध्या प्रिन्स, सिझर, मॅक्स, बॉऊनी, लकी, स्नॉइस, लायका असे सात श्वान या पथकात आहेत. २६/११ हल्ल्यात हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांनी ठेवलेले आरडीएक्स शोधून काढण्याचे काम प्रिन्स, सिझर आणि मॅक्स या श्वानांनी केले होते.
पुण्यातील शिवाजीनगर केंद्रात नऊ महिने श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. त्यात गंधावरून माग काढणे, परेड, स्फोटके शोधणे इत्यादींचा समावेश असतो. मुंबईच्या संरक्षणामध्ये या बॉम्बशोधक श्वानांनी मोलाची कामगिरी केली आहे.