छोटा राजनला शुक्रवारी सकाळी विशेष विमानाने दिल्लीत आणले असून त्याला दिल्ली येथील सीबीआय मुख्यालयाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.
नवी दिल्ली- अखेर छोटा राजनला शुक्रवारी सकाळी इंडोनेशियाहून नवी दिल्लीत आणले. आज पावणे सहाच्या सुमारास छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला भारतात विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले आहे. त्याला दिल्ली येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुख्यालयातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. मुख्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
इंडोनेशियातील बाली येथे छोटा राजनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी सीबीआयचे अधिकारी बाली येथे पोहोचले. राजनच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया दोन दिवसापूर्वीच पूर्ण झाली होती. मात्र ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मागच्या दोन दिवसांपासून बाली विमानतळ बंद होता. त्यामुळे छोटा राजनची भारतवापसी लांबली. अखेर गुरुवारी बाली येथील विमानसेवा पूर्ववत झाल्यानंतर विशेष विमानाने छोटा राजनला शुक्रवारी पहाटे भारतात आणले आहे.
राजनची चौकशी केल्यानंतर त्याला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात येईल. न्यायालयात त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात यावे अशी मागणी सीबीआय करणार असल्याचे समजते.
विमानतळावर उतरल्यानंतर राजनने भारतीय भूमीवर नतमस्तक होऊन भारतभूमीचे चुंबन घेतले. छोटा राजनच्या जिवाला धोका असल्यामुळे त्याचा डमी देखिल सोबत ठेवण्यात आल्याचे काही वृत्तवाहिण्यांनी दावा केला आहे. राजनला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह त्याच्या गँगच्या काही असंतूष्ट लोकांकडूनही दगाफटका होण्याची भीती आहे. काही राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलिस अधिका-यांपासून राजनला धोका आहे. त्यामुळे ते त्याला संपवण्याचा प्रयत्न करु शकतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांपासून बचाव आणि त्याच्यावरील हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन, असे करण्यात आल्याचे समजते. राजन दिल्लीत पोहोचल्यानंतर काही प्रसारमाध्यमांच्या गाड्यांनी त्याच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो राजनचा डमी होता. त्याचवेळी प्रसारमाध्यमांना चकवा देत खरा राजन मात्र सीबीआय मुख्यालयात पोहोचला होता.
दरम्यान राज्य सरकारने सीबीआयला छोटा राजनविषयी सर्व माहिती दिली आहे. त्याच्याविरुद्धचे मुंबईसह राज्यातील सर्व गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक घेवून हा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक करारानुसार (यूएनसीटीओसी) त्याच्याविरुद्धचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याचे राज्याचे अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी सांगितले. तसेच या तपासात मुंबई पोलीस सीबीआयला आवश्यक ती मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला राज्याचे अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांच्यासह पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद, सहआयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
त्यामुळे आता छोटा राजनची चौकशी सीबीआय करणार आहे. भारतात छोटा राजनवर सुमारे ७५ गुन्हे दाखल असून त्यापैकी ५३ गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात आहे.