डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधून चेंबूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ फूट उंच रांगोळी साकारण्यात आली आहे. सांगलीतील नामवंत कलाकार आदम अली मुजावर यांनी ती साकारली आहे.
मुंबई– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधून चेंबूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ फूट उंच रांगोळी साकारण्यात आली आहे. सांगलीतील नामवंत कलाकार आदम अली मुजावर यांनी ती साकारली आहे.
डॉ. आंबेडकर हायस्कूलच्या मैदानावर ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. ही रांगोळी तयार करण्यासाठी सलग सात दिवस मेहनत करावी लागल्याची माहिती मुजावर यांनी दिली.
या १२५ फूट आकाराच्या साकारलेल्या रांगोळीच्या विक्रमासाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड व लिम्का बुककडे नोंदणी केल्याची माहितीही त्यांनी दिली. या रांगोळीसाठी ४०० किलो कागद, ७०० किलो रंगांचा वापर करण्यात आला आहे. तर १०० बाय २००चा शामियाना वापरण्यात आला आहे.
आपण मागील वर्षी शीव येथील सोमय्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य रांगोळी काढली होती. त्याच कल्पनेतून बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने चेंबूर येथे ही रांगोळी काढली असल्याचेही मुजावर म्हणाले. ही रांगोळी येत्या २० एप्रिलपर्यंत प्रेक्षकांना पाहण्यासाठी ठेवली जाणार आहे.
दरम्यान, विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने शहरातील रेल्वे स्थानके, चौक यांच्यासह विविध पक्ष संघटनांकडून जयंती साजरी करत आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. तर अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन केले.