चेंबूरमधील दिवालीबेन मेहता या महापालिकेशी संलग्न रुग्णालयात ‘शांताबाई’ गाण्यावर ठुमके लावणा-या कर्मचा-यांना हे नाचकाम चांगलेच महागात पडले आहे.
मुंबई- चेंबूरमधील दिवालीबेन मेहता या महापालिकेशी संलग्न रुग्णालयात ‘शांताबाई’ गाण्यावर ठुमके लावणा-या कर्मचा-यांना हे नाचकाम चांगलेच महागात पडले आहे. रुग्णालयात लोक उपचारासाठी येत असतात. त्यामुळे हा परिसर शांत असला पाहिजे.
मात्र मेहता रुग्णालयातील बाहृयरुग्ण विभागात शांताबाईच्या गाण्यावर कर्मचा-यांनी ठेका धरून शांतता भंग केल्याने त्याचे तीव्र पडसाद बुधवारी मुंबई महापालिका स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश देत दोषी आढळणा-या कर्मचा-यांवर कारवाईचे आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिले आहेत.
चेंबूरच्या ‘दिवालीबेन मेहता’ या पालिकेशी संलग्न रुग्णालयात ८०० हून अधिक रुग्ण उपचारसाठी येतात. तळमजल्यावर सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची तपासणी होते. तर अन्य आजारांच्या रुग्णांसाठी पहिल्या मजल्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र २ मार्च रोजी पहिल्या मजल्यावर हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी स्पीकर लावून चक्क गाणी वाजवून रुग्णालयातील कर्मचारी व त्यांच्या मुलांनी ठेका धरला. या आवाजाने रुग्णांचे हाल झाल्याची तक्रार करण्यात आली असून या कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिपही पालिका प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे.
या कार्यक्रमात रुग्णालयातील महिला कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाल्याचे बोलले जात आहे. समारंभाच्या दिवशी बाह्यरुग्ण विभागात ३७७ रुग्णांच्या तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पहिल्यांदा काँग्रेस नगरसेविका वकारूनिस्सा यांनी क्लिपच्या चौकशीची मागणी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी या प्रकरणाची १५ दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.