चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठी गंभीर आणि युवराजला संघातून डच्चू देण्यात आला असून इरफान पठाणने मात्र संघात पुनरागमन केले आहे.
मुंबई- चँपियन्स ट्रॉफी वनडेच्यानिमित्ताने यष्टिरक्षक, फलंदाज दिनेश कार्तिकसह सलामीवीर मुरली विजय, अष्टपैलू इरफान पठाण आणि आर. विनय कुमारचे भारतीय संघात पुनरागमन झाले. भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा शनिवारी मुंबईत करण्यात आली. त्यात धडाकेबाज कसोटी पदापंण करणा-या शिखर धवनचाही समावेश आहे.
संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवडसमितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सनसनाटी पदार्पण करणा-या शिखर धवनला मुख्य सलामीवीर म्हणून पसंती दिली आहे. तसेच गौतम गंभीरऐवजी विजयच्या निवडीला प्राधान्य दिले. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध फॉर्म मिळवत दमदार पुनरागमन करणा-या विजयला आयपीएलच्या सहाव्या मोसमात फॉर्म राखता आलेला नाही. आयपीएलमधील खराब कामगिरीचा फटका मध्यमगती अशोक डिंडा आणि अजिंक्य रहाणेला बसला आहे.
महेंद्रसिंग ढोणीच्या नेतृत्वाखालील संघात शिखर धवन, मुरली विजय, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा असे पाच ‘स्पेशालिस्ट’ फलंदाज आहेत. यष्टिरक्षक ढोणीला सहकारी म्हणून कार्तिकचा समावेश करण्यात आला आहे. गंभीरच्या अनुपस्थितीत धवन आणि विजय डावाची सुरुवात करतील. राखीव सलामीवीर म्हणून कार्तिकचाही पर्याय आहे.
इंग्लंडमधील वेगवान खेळपट्टया पाहता पाच मध्यमगती गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात इशांत शर्मासह भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इरफान पठाण आणि आर. विनय कुमारचा समावेश आहे. आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरीमुळे लेगस्पिनर अमित मिश्राला संघाचे दरवाजे खुले झाले. त्याच्यासह ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजावर फिरकीची भिस्त आहे.
गंभीर, प्रवीण विंडिजविरुद्धच्या संभाव्य संघात
चँपियन्स ट्रॉफीनंतर वेस्ट इंडिजमध्ये होणा-या तिरंगी मालिकेसाठीच्या २१ सदस्यीय संभाव्य संघात गौतम गंभीरचा समावेश आहे. या संघात त्याच्यासह मनोज तिवारी, प्रवीण कुमार, मोहम्मद शामी, अंबाती रायडू, राहुल शर्माचा समावेश आहे.
संघात: धवन, कार्तिक, विजय, इरफान, उमेश, विनयकुमार.
संघाबाहेर: गंभीर, युवराज, पुजारा, रहाणे, शामी, डिंडा.
असा आहे संघ
महेंद्रसिंग ढोणी (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मुरली विजय, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इरफान पठाण, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अमित मिश्रा, आर. विनयकुमार.