चार वर्षीय मुलीला घरकामास जुंपून तिला मारहाण करणा-या प्रमिला यादव नामक काकीला टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण- चार वर्षीय मुलीला घरकामास जुंपून तिला मारहाण करणा-या प्रमिला यादव नामक काकीला टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. काकीकडून नेहमीच होणा-या मारहाणीत ही मुलगी जबर जखमी झाल्याने तिच्यावर कल्याण पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळून तिचे चांगले संगोपन व्हावे, यासाठी बिहारमध्ये राहणा-या तिच्या माता-पित्यांनी तिला मुंबईला काकीकडे धाडले. पण अवघ्या काही दिवसांत रंग दाखवून निर्दयी काकीने मुलीला कामाला जुंपून तिचा छळ सुरू केल्याचे उघड झाले आहे.
टिटवाळय़ातील सरनोबतनगरमध्ये राहणारे प्रमिला यादव यांचे कुटुंब मूळचे बिहारचे. ते मागील काही वर्षापासून येथे राहते. या महिलेला तीन मुले असून तिचे पती भिंवडी येथे एका कंपनीत नोकरीला आहेत. प्रमिला हिने सहा महिन्यांपूवी बिहार येथे राहणारे तिचे दीर नागेंद्रप्रसाद यांच्याकडून त्यांच्या चार वर्षीय मुलीला मुंबईत शिक्षणासाठी आणले. पण काकीने काही दिवसांनंतर तिला घरकामासाठी जुंपले. इतकेच नाही तर मागील सहा महिन्यांपासून काकीकडून तिला अमानुष मारहाणही होत होती.
गुरुवारी ही मुलगी रडत असल्याचे याच परिसरात राहणारे केडीएमसीचे उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी त्या ठिकाणाहून जात असताना पाहिले. त्यांनी या मुलीसंदर्भात विचारण केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. सरनोबत यांनी तात्काळ या मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी टिटवाळा पोलिसांत गुन्हा दाखल केला असून प्रमिला यादव हिला अटक केली आहे म् पोलिसांनी या मुलीच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिली.
याप्रकरणी तक्रार दाखल करून वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते. सरनोबत यांना चुकीची महिती देऊन गुन्हा दाखल करून घेण्यास दिरंगाई करणा-यांवर कारवाई करणार. – दिलीप गोडबोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक टिटवाळा